Marathi News Photo gallery Riteish deshmukh rally in support of his brother Dhiraj Deshmukh delivers dialogues of bigg boss marathi winner suraj chavan
“झापूक झुपूक वारं आलंय, समोर गुलिगत धोका..”; प्रचारसभेत रितेश देशमुखची डायलॉगबाजी
बंधू धीरज देशमुख यांच्यासाठी अभिनेता रितेश देशमुखने नुकतीच लातूरमध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत रितेशची चांगलीच डायलॉगबाजी पहायला मिळाली. लय भारी या चित्रपटातील आणि बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणचे डायलॉग म्हणत रितेशने ही सभा गाजवली.
1 / 5
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज देशमुख निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासाठी आता त्यांचे बंधू आणि अभिनेता रितेश देशमुख प्रचाराच्या मैदानात उतरला आहे. रितेशने लातूरमध्ये प्रचारसभा घेतली असून त्यात त्याची डायलॉगबाजी पहायला मिळाली.
2 / 5
रितेशने त्याच्या 'लय भारी' या चित्रपटातील आणि 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण याचे डायलॉग्स उपस्थितांन ऐकवत प्रचारसभेत रंगत आणली. "आमचे धाकटे बंधू, लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज भैय्या.. लय भारी धीरज भैय्या! काल जो महिला मेळावा झाला, तेव्हाच विजय झाला. आता ही लीडची सभा आहे, तुमच्या कामाची ही पावती आहे," असं तो म्हणाला.
3 / 5
"गेल्या वेळी एक लाख मतांनी तुम्ही धीरज देशमुख यांना निवडून दिलं. धीरज नेहमी लोकांसाठी काम करतो, लोकांच्या वेदना कमी करायच्या आहेत ही भावना महत्वाची आहे. लोकसभेला जे वारं होतं, आता विधानसभेला झापुक झुपूक वारं झालेलं आहे. त्यामुळे काहीही काळजी करू नका, आता समोर गुलिगत धोका आहे," अशी रितेशची डायलॉगबाजी पहायला मिळाली.
4 / 5
"सावधान राहा, त्या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. आता बुक्कीत नाही, बटणावर टेंगूळ द्यायची वेळ आली. महाविकास आघाडीचंच सरकार येणार. तुमचा पंजा भारी, सगळ्यांचा पंजा भारी. प्रत्येकाने गावात जा, बुथवर जा ,अफवा भूलथापा बाळगू नका, गाफील होऊ नका," असं आवाहन रितेशने लातूरकरांना केलं.
5 / 5
"यावेळी एक लाखापेक्षा जास्त लीड हवी. रिक्वेस्ट करत नाही हा साहेब, आपला भाऊ म्हणून सांगतोय,गाफील राहू नका. मतदार यादी पहा, मतदान केंद्रावर घेवून या आणि मतदान करून घ्या. नंतर आपण धिंगाणा करू, विजयाचा गुळाला उधळू. आज विलासराव देशमुख साहेबांची आठवण येतेय. अमित भैय्या आणि धीरज त्यांच्या विचारांवर चालत आहेत. लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमध्ये मोठा रेकॉर्ड झाला पाहिजे," असंही रितेश यावेळी म्हणाला.