फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाला याड लावलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 29 एप्रिल 2016 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
आता चित्रपटाला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने 'सैराट' पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय. आर्ची-परश्याची याड लावणारी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.
यानिमित्त आकाश ठोसरने 'सैराट'ची पडद्यामागील दृश्ये शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरने मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
'सैराट... पिक्चर शूट करतानाचा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नगत होता आणि पिक्चर रिलीज झाल्यानंतरचा हा 9 वर्षांचा प्रवास तुम्ही बघतच आलाय", असं त्याने लिहिलंय.
"आज 9 वर्षांनी सैराट परत रिलीज होतोय, याचा आम्हाला आज खरंच खूप आनंद होत आहे. परत मोठ्या स्क्रीनवर आर्ची-परश्या म्हणून तुम्हाला भेटायला येतोय", असं त्याने पुढे म्हटलंय.
"आणि हे शक्य झालं ते फक्त नागराज आण्णामुळे! नागराज मंजुळे यांच्या सैराटमुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्याबद्दल आम्ही आण्णांचे कायम ऋणी राहू आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठी धन्यवाद. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन परत 'सैराटमय' व्हायला विसरू नका", असं आवाहन त्यांने चाहत्यांना केलंय.
सैराट या चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरूला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. अजय-अतुलने या चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केलं. यातील गाणी आजसुद्धा लोकप्रिय आहेत.
या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 100 कोटी रुपयांची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता.