सीमा देव ते रवींद्र बेर्डे.. वर्षभरात ‘या’ मराठी कलाकारांनी घेतला अखेरचा निरोप
2023 या वर्षात मराठी चित्रपट आणि मालिकाविश्वातील काही कलाकारांनी आपले प्राण गमावले. या कलाकारांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान चाहत्यांच्या कायम लक्षात राहील.
1 / 5
जून महिन्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (सुलोचना दीदी) यांचं निधन झालं. त्या 94 वर्षांच्या होत्या. 3 जून रोजी सुलोचना दीदी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मार्च महिन्यापासून त्यांना श्वास घेण्यास अडचण जाणवत होती. सुलोचना दीदी यांनी बॉलिवूडसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
2 / 5
ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन झालं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते. ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मिलिंद सफई यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
3 / 5
मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेते अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी यांचं ऑगस्ट महिन्यात निधन झालं. तळेगाव इथल्या एका सदनिकेत ते मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांनी ही माहिती समोर आली होती. ते कुटुंबीयांपासून दूर वेगळे आणि एकटेच राहत होते.
4 / 5
मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचंही ऑगस्ट महिन्यात दीर्घ आराजाने निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. त्यांना अल्जायमर होता. 2020 मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देवने सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली होती.
5 / 5
13 डिसेंबर रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. मुंबईतील टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रवींद्र यांनी बंधू लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.