आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकावलं आहे. बांगलादेशविरुद्ध चमकदार कामगिरी केल्याचा त्याला फायदा झाला आहे. 870 गुणांसह जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह यापूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये अव्वल स्थानी होता.
कसोटी क्रिकेटच्या गोलंदाजांच्या यादीत फिरकीपटू आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आर अश्विन अव्वल स्थानी होता. सध्या आर अश्विने 869 गुण आहेत. तर जसप्रीत बुमराहचे 870 गुण असल्याने अश्विनची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
क्रिकेटच्या इतिहासात तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा पहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान पटकावणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. बुमराह 2022 मध्ये वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये अव्वल होता. आता कसोटीतही नंबर 1 गोलंदाज म्हणून छाप पाडली आहे.
आयसीसी क्रमवारीत क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये अव्वल स्थान यापूर्वी विराट कोहलीने पटकावलं आहे. टी20, वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी होता.
जसप्रीत बुमराह (870 गुण) आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज अश्विन (869 गुण) दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (847 गुण) तिसऱ्या, पॅट कमिन्स (820 गुण) चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा (820 गुण) पाचव्या स्थानावर आहे. (सर्व फोटो- बीसीसीआय)