भारताने टी20 मालिकेत श्रीलंकेला लोळवलं. पण वनडे मालिकेत त्याच्या विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आणि चांगली सुरुवात करूनही जिंकता आलेलं नाही. त्यामुळे वनडे मालिका गमवण्याची वेळ आली आहे.
दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाला 208 धावांत गुंडाळले आणि 32 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा होता. पण काही चुकांमुळे पराभवाची किंमत मोजावी लागली. आता तिसऱ्या वनडेपूर्वी भारताने तीन चुका सुधारणं गरजेचं आहे.
कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर फलंदाज आक्रमणाऐवजी बचावात्मक पवित्र्यात दिसले. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांनी फायदा उचलला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या 5 विकेट एलबीडब्ल्यू करून घेतल्या.
कोलंबोची खेळपट्टी फिरकीपटूंना अधिक मदत करत आहे. याची पूर्ण कल्पना श्रीलंकेच्या खेळाडू आणि प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांना आहे. त्यामुळे श्रीलंका 5 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरते. पण भारतीय संघ फिरकी गोलंदाजीवर विसंबून न राहता आहे तोच संघ खेळवत आहे.
भारताच्या ताफ्यात रियान परागसारखा फिरकी गोलंदाज आहे. त्याने टी20 मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. पण त्याच्याऐवजी शिवम दुबेला संघात स्थान दिलं गेलं. शिवम दुबे आतापर्यंत या मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला आहे.