जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतात बनवण्याची तयारी आता सुरू झाली आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथे हे स्टेडियम बांधले जाणार आहे. यासाठी 2 जुलै रोजी जागा देण्यात आली. हे क्रिकेट स्टेडियम चंप गावात तयार होईल. या वर्षाच्या सुरूवातीस राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख वैभव गहलोत यांनी जयपूरमध्ये नवीन क्रिकेट स्टेडियम उभारण्याची घोषणा केली होती.
जयपूर शहराबाहेर नवीन क्रिकेट स्टेडियम तयार केले जाईल. हे स्टेडिम दोन टप्प्यात तयार होईल. पहिल्या टप्प्यात 45 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची क्षमता असलेले हे स्टेडियम तयार केले जाईल. मग त्याची क्षमता 30 हजार अधिक वाढविली जाईल. अशा प्रकारे स्टेडियम पूर्णपणे तयार झाल्यावर एकूण 75 हजार प्रेक्षक या स्टेडियममध्ये बसू शकतील. म्हणजेच हे जगातील तिसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असेल. गुजरातचे नरेंद्र मोदी स्टेडियम पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची प्रेक्षक क्षमता 1.10 लाख आहे. दुसर्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट स्टेडियम आहे. यात एक लाख प्रेक्षक बसू शकतात.
100 एकर जागेत नवीन स्टेडियम तयार होईल. यासाठी एकूण खर्च 650 कोटी रुपये होईल. पहिल्या टप्प्यात 300 कोटी रुपये खर्च केले जातील. यासाठी बीसीसीआय 100 कोटी रुपये देईल तर 100 कोटींचे कर्ज उभे केले जाईल. त्याचबरोबर आरसीए 90 कोटींची व्यवस्था करेल. यासाठी कॉर्पोरेट बॉक्स विकण्याचा प्रयत्न केला जाईल. हे स्टेडियम पूर्णपणे तयार होण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल. त्याचबरोबर अडीच ते तीन वर्षांत पहिला टप्पा पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे. हे स्टेडियम उभारण्याचे काम इथून पुढच्या 75 दिवसांत सुरु होईल. हे स्टेडियम जयपूर-दिल्ली महामार्गावर बांधले जाईल.
या क्रिकेट स्टेडियममध्ये दोन सराव मैदान, अकादमी, क्लब हाऊस, हॉटेल, क्रिकेट अॅकॅडमी, वसतिगृह, जिम, पार्किंगची सुविधा आणि बाकीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारख्या आवश्यक सुविधा असतील. अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेपूर्वी आरसीएचे अध्यक्ष वैभव गहलोत नरेंद्र मोदी स्टेडियमवर गेले होते. तेथे त्यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी स्टेडियमबद्दलही माहिती घेतली.
सध्या राजस्थानमधील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम सवाई मानसिंग स्टेडियम आहे. पण ते आरसीएचे नाही. हे राजस्थान सरकारच्या अखत्यारीत येते. येथे सामने खेळण्यासाठी आरसीएला सरकारकडून स्टेडियम घ्यावे लागेल. आरसीए नवीन स्टेडियमच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.