टीम इंडियाचा अनुभवी विकेटकीपर ऋद्धीमान साहा याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपल्यात जमा आहे. मात्र तो आयपीएलमध्ये खेळतोय. आयपीएलमध्ये साहा यंदा गुजरात टायटन्सकडून खेळतोय. साहाने गुजरातसाठी सुरुवातीच्या सामन्यात शुबमन गिल सोबत ओपनिंग केली. मात्र साहाला या संधीचा फायदा घेता आला नाही.
साहा यासाठी आयपीएलचा 16 वा मोसम फार निर्णायक आहे. कारण साहाला आयपीएलमध्ये करुन दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे साहाला टीम इंडियात जागा मिळवायची असेल, तर त्याला चमकदार कामगिरी करावी लागेल.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी वार्षिक करार जाहीर केला. साहाला या करारातून वगळण्यात आलं. विकेटकीपर म्हणून केएस भरत याने टीम इंडियात साहाची जागा घेतली आहे.
गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये 15 व्या मोसमातून पदार्पण केलं. साहा गेल्या मोसमापासून गुजरातकडून खेळतोय. साहाने 2022 मध्ये 11 सामन्यात 3 अर्धशतकांसह 317 धावा केल्याा. मात्र यंदाच्या 16 व्या हंगामात साहाला 2 सामन्यात 39 धावाच करता आल्या आहेत.
साहाने आपल्या आयपीएल कारकीर्दीत 146 सामन्यांमध्ये 2 हजार 466 धावा केल्या आहेत. साहाची 115 ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. साहाने आपल्या कारकीर्दीत 11 अर्धशतकं आणि 1 शतक ठोकलं आहे. तसेच साहाने विकेटकीपर म्हणून 22 स्टपिंग आणि 81 कॅच घेतल्या आहेत.