वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार आहेत. यासाठी सराव सामनेही सुरु आहेत. काही खेळाडू स्पर्धेपूर्वी फॉर्मात असल्याने त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे.
स्टार स्पोर्ट्स वाहिनीने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 7 दिग्गज खेळाडूंची नाव जाहीर केली आहेत. यात दोन भारतीयांचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात त्यांचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील इतिहास
विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे. रनमशिन्स म्हणून ख्याती असलेल्या विराट कोहली याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. विराट कोहली सध्या फॉर्मात असून त्याने वनडे क्रिकेटमध्ये 57.38 च्या सरासरीने 13083 धावा केल्या आहेत. विराट कोहलीकडून या स्पर्धेत अप्रतिम कामगिरीची अपेक्षा आहे.
बाबर आझम या यादीतील दुसरा खेळाडू आहे. पाकिस्तानचा संघ बाबर आझमच्या कामगिरीवर अवलंबून आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्याने पाकिस्तानसाठी 108 वनडे सामने खेळले असून 5409 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघात सध्या सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा कणा आहे असं म्हणावं लागेल. आघाडीचे फलंदाज निष्फळ ठरले की मधल्या फळीतील स्टीव्ह स्मिथ जबाबदारी योग्य प्रकारे पूर्ण करतो. त्याने 145 सामन्यात 5054 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा याचाही या यादीत समावेश आहे. पहिल्या दहा षटकात सामना पालटण्याची क्षमता हिटमॅनमध्ये आहे. त्याने 251 एकदिवसीय सामन्यात 10112 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडून टीम इंडियाला बऱ्यात अपेक्षा आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. किवीकडून 161 वनडे सामने खेळताना केननं 6555 धावा केल्या आहेत. त्यामुळे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत नेईल अशी अपेक्षा आहे.
जो रूट हा इंग्लंडच्या मधल्या फळीतील जबरदस्त फलंदाज आहे. मधल्या फळीत अनेकदा त्यांनी प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवून दिली आहे. इंग्लंडकडून 162 वनडे सामने खेळणाऱ्या जो रूटने 6246 धावा केल्या आहेत.
डेविड वॉर्नर हा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आक्रमक सुरुवात करून देईल यात शंका नाही. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 150 वनडे सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्याने 6397 धावा केल्या आहेत.