Marathi News Photo gallery Telangana CM Revanth Reddy met tollywood actors amid Pushpa Stampede Row law and order can not be compromised
कायदा-सुव्यवस्थेशी तडजोड नाही..; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली कलाकारांची भेट
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी कलाकारांना स्पष्ट केलं की, सरकार कायदा आणि सुव्यवस्थेशी तडजोड करणार नाही.
1 / 5
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी टॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांसोबत विशेष बैठक घेततली. या बैठकीत त्यांनी टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीकडून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याच्या गरजेवर भर दिला. तेलंगणा फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (FDC) अध्यक्ष दिल राजू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
2 / 5
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची अटक आणि चौकशी, चेंगराचेंगरीच्या घटनेवरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया.. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा प्रशासन आणि टॉलिवूड फिल्म इंडस्ट्री यांच्यातील तणावपूर्ण संबंध मिटवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
3 / 5
या बैठकीला नागार्जुन, वरुण तेज, साई धरम तेज, कल्याण राम, शिवा बालाजी, अदवी शेष, नितीन आणि व्यंकटेश यांसारखे कलाकार उपस्थित होते. याशिवाय दिग्दर्शक कोरटला शिवा, अनिल रविपुडी, के. राघवेंद्र राव, प्रशांत वर्मा, साई राजेश आणि निर्माते सुरेश बाबू, केएल नारायण, दामोदर, अल्लू अरविंद, चिन्ना बाबू या बैठकीला हजर होते.
4 / 5
'पुष्पा 2'च्या प्रीमिअरदरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. बैठकीत या घटनेचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. "सेलिब्रिटींनी चाहत्यांच्या शिस्तबद्धतेबाबत काळजी बाळगायला हवी. गर्दीचं नियोजन ही सेलिब्रिटींची जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सरकार कोणतीही तडजोड करणार नाही", असं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले.
5 / 5
मुख्यमंत्र्यांनी सध्या चित्रपटांचे बेनिफिट शोज किंवा स्पेशल स्क्रिनिंगवर बंदी घातली आहे. त्याचप्रमाणे अल्लू अर्जुनसारख्या हाय-प्रोफाइल अभिनेत्यांच्या खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे. संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेदरम्यान बाऊन्सर्स चाहत्यांसोबत बेपर्वाने वागताना दिसले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला.