राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढतेय. अशावेळी कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. हा लॉकडाऊन का गरजेचा आहे? याचं उत्तर तुम्हाला उस्मानाबादच्या स्मशानभूमीतील चित्र पाहिल्यावर लक्षात येईल.
उस्मानाबादच्या स्मशानभूमीत आज एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे चित्र पाहून स्मशानभूमीही गहिवरली असेल!
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही चिंताजनक बनत आहे. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत आज 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती.
इतकच काय तर सरण रचण्यासाठी लाकडं कमी पडत आहेत. त्यामुळे कमी लाकडांवरच मृतदेहांवर अंत्यविधी केले जात आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन 590 रुग्ण सापडले आहेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 224 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत. सक्रिय रुग्णाची संख्या 4 हजार 940 झाली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर सातत्याने करत आहेत.