घरात प्रवेश करताच वसंताचे वैभवाचे दर्शन : उन्हाच्या झळांमुळे वृक्ष वेली सुकत असतांनाच यवतमाळ च्या पुसद येथील प्रा सुरेखा खाडे यांचे ग्रीन पार्क मधील 'वनराई' नाव असलेले घर फुलांनी बहरले आहे. त्यांच्या संपूर्ण घराच्या भिंतींना घट्ट धरून असलेल्या "कॅटक्लॉज" ने तर जणू पिवळा शालूच ओढला आहे.
'कॅटक्लोज' च्या वेलीचे अच्छादन : 2007 साली आणलेला हा वेल त्यांनी परसबागेत घराच्या पायथ्याशी लावला आणि बघता बघता मांजरीच्या पंजा प्रमाणे त्याने घरावर चाल चढविली. हा वेल 'कॅटक्लॉज' नावाने ओळखल्या जातो.
सात वर्षाची मेहनत आली कामी: शहरातील सिमेंट घरांच्या जंगलात निसर्गाचा सानिध्य लाभणे एवढे सोपे नाही. प्रा. सुरेखा व प्रा वसंत खाडे यांनी अशा प्रकारचे घर करण्यासाठी 7 वर्ष मेहनत घेतली आहे. शिवाय त्याचा मेंटनन्स हा वेगळाच. त्यामुळे भर उन्हाळ्यात हे पुसद करांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
निसर्गप्रेमींची घराकडे ये-जा : एकीकडे वसंतात वृक्षांची पानगळ झालेली असतांना वनराईला मात्र पिवळ्याजर्द कॅट क्लॉज फुलांनी आलिंगन दिले आहे. हा सुंदर नजारा अनुभवण्यासाठी या फुल वाल्या प्राध्यापक दाम्पत्याकडे कडे पुसदकरांची गर्दी होऊ लागली आहे.
पुसद शहरात 'वनराई'चे वेगळेपण: सध्या उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. पण या वनराईमध्ये प्रवेश केल्यावर उन्हाळ्याची जाणीवच होत नाही. संपूर्ण शहरात हे हिरवा शालू पांघरलेले घर लक्ष वेधून घेत आहे. यामागे खाडे दाम्पत्यांची सात वर्षाची मेहनत आहे.