टोक्यो ओलिम्पिकच्या (Tokyo Olympics 2020) उपांत्य पूर्व फेरीत भारतीय महिला हॉकी संघाने अप्रतिम खेळ दाखवला. इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिलांनी सेमीफायनलमध्ये धडक घेतली आहे. या विजयात सर्व संघाने मोलाचं योगदान दिलं पण काही महिलांनी कमालीचा खेळ दाखवला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरजीत कौरने एकमेव गोल करत भारताला विजयी आघाडी मिळवून दिली. तर गोलकीपर सविताने अप्रतिम संरक्षण करत बरेच गोल अडवले. भारताच्या डिफेन्डर्सनी देखील तिला चांगली साथ दिली. कर्णधार रानी रामपालच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिलांनी हा प्रवास पूर्ण केला आहे. ग्रुप स्टेजमध्ये लालरेमसियामी आणि वंदना कटारिया यांनीदेखील दिमाखदार खेळ दाखवला.वंदनाने दक्षिण आफ्रीका संघाविरुद्ध 3 गोल करत हॅट्रीकही केली होती.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताकडून 22 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताच्या गुरजीत कौरने एकमात्र गोल केला. या एका गोलच्या आघाडीवर विजय मिळवत सेमी फायनलमध्ये पोहोचलेली भारतीय टीम बुधवारी (4 ऑगस्ट) अर्जेंटीना संघासोबत भिडेल.
ओलिम्पिक महिला हॉकी संघाने 1980 पासून आतंरराष्ट्रीय सामने खेळायला सुरुवात केली. पण अद्यापर्यंत महिलांना उपांत्यपूर्व फेरीही गाठता आली नव्हती. पण यंदा उपांत्य पूर्व फेरीच नाही तर सेमीफायनलमध्ये धडक घेत पदकापासून केवळ एकच पाऊल दूर राहिले आहेत.
उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा सामना भारतीय महिलांसाठी कठीण मानला जात होता. दिग्गज आणि तज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलिया संघ अधिक बलाढ्य मानला जात होता. याआधी तीन वेळेस ऑलिम्पिक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने यंदाही ग्रुप स्टेजमध्ये केवळ एकच गोल खाल्ला होता. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ ग्रुप स्टेजमध्ये 7 गोल खाऊन उपांत्य पूर्व फेरीत पोहोचली होती. पण या सामन्यातील 4 क्वार्टरमध्ये 60 मिनिटांपर्यंत अप्रतिम हॉकीचे दर्शन घडवत भारतीय महिलांनी विजयश्री मिळवला.