सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका हा द्राक्षबाग शेतीला बसलेला आहे. जत तालुक्यामध्ये वादळ वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षबाग शेतीचा मोठा नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागा जमीनदोस्त झाले आहेत.
Rain
मिरज, सांगली शहरांस अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. मिरज शहरामध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे मिरज शहरांमध्ये काही वेळातच अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यानंतर सांगली शहराला देखील अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
प्रचंड वादळी वाऱ्यासह सांगली शहरामध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार अवकाळी पाऊस पडला आहे. वादळी वाऱ्यामुळे बेदाणा शेडवरील ताडपत्री तरच अनेक ठिकाणी घरांची पत्रे देखील उडून गेलेले आहेत. वादळी वारा व पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता.
सोलापूर जिल्ह्यातीला शेतीला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका बसला. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरासमधील टरबूज बाग मातीमोल झाली. एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील तापमान दिवासेंदिवस चाळीशीच्या पलीकडे जात असल्याने फळपिकांना तग धरणे कठीण झाले असताना हे संकट आले आहे.
बार्शी तालुक्यातील राळेरासमधील शेतकरी मोतीबुवा गोसावी यांचे एक एकर टरबूजाचे नुकसान झाले आहे. इतर अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे चित्र सध्या सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.