‘मुन्नाभाई एमबीबीएस’नंतर हिंदीत यायला वेळ का लागला? प्रिया बापटने दिलं उत्तर
संजय दत्तच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटानंतर हिंदीत काम करायला अभिनेत्री प्रिया बापटने बराच वेळ घेतला. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विस्फोट' या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. याविषयी तिने नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे.
1 / 6
अभिनेत्री प्रिया बापटने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदीत दमदार भूमिका साकारल्या आहेत. 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटातील तिची भूमिका अनेकांच्या लक्षात आहे. मात्र त्यानंतर तिने हिंदीत पुन्हा काम करायला बरीच वर्षे घेतली. यामागचं कारण प्रियाने नुकत्याच एका पोस्टद्वारे सांगितलं आहे.
2 / 6
या पोस्टमध्ये प्रियाने लिहिलंय, "विस्फोट या माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटातील ही तारा आहे. मुन्नाभाईनंतर मला पुन्हा हिंदीत काम करायला इतकी वर्षे का लागली, असा प्रश्न मला प्रत्येकाने विचारला. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मी कधीच प्लॅन केला नव्हता. मी माझ्या प्रवासाला त्याच्या गती आणि दिशेनुसार पुढे जाऊ दिलं आणि जेव्हा संधी आली तेव्हा मी ते स्वीकारलं."
3 / 6
'अनेकांना तारा ही भूमिका फार आवडली आणि काहींना ती पटली नाही कारण ती तिच्या पतीची फसवणूक करते. ही भूमिका साकारण्याचा अनुभव, कोणतंही मत न बनवता तिची भावनिक स्थिती समजून घेणं खूपच रंजक होतं', असं तिने पुढे लिहिलंय.
4 / 6
ताराची भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असण्यामागचं कारण सांगताना प्रियाने म्हटलंय, 'तिचा एक मतप्रवाह आहे, ती बिनधास्त आहे आणि तिला तिची वास्तविकता माहीत आहे. काय योग्य आणि काय अयोग्य हे व्यक्तीनिष्ठ असतं. परंतु, स्वत:चा आनंद शोधणाऱ्या स्त्रीचं चित्रण करणं पितृसत्ताकतेला एक नवीन आव्हान देतं.'
5 / 6
'ही भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं आणि प्रत्येक भूमिकेतील आव्हानांपेक्षा एखादा कलाकार अजून काय मागू शकतो? मी रितेश सर यांचे आभार मानते. ते फक्त उत्तम अभिनेतेच नाही तर अप्रतिम सहकलाकारसुद्धा आहेत', अशा शब्दांत प्रियाने रितेशचं कौतुक केलं. यावेळी तिने दिग्दर्शकांचेही आभार मानले.
6 / 6
'तुमच्या परफॉर्मन्समुळे तुमच्यासोबतचा प्रत्येक सीन शक्य झाला. एका पराभूत तरीही लढणाऱ्या वडिलांच्या भूमिकेचं तुम्ही केलेलं चित्रण पाहून त्यावर व्यक्त होण्यासाठी मला खूप काही मिळालं', असंही तिने लिहिलंय. विस्फोट हा चित्रपट सध्या जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय.