झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'लग्न सराई विशेष' भागांमध्ये ‘पारू-आदित्य’, ‘आकाश-वसुंधरा’ आणि ‘एजे-लीला’ लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. या तीन जोडप्यांचं नातं भलेही प्रेमाच्या पायावर जोडलं गेलं नसेल, पण त्यांच्यासमोर येणारं आयुष्य काय बदल घडवेल ते बघण्यासारखं असणार आहे.
'पारू आणि आदित्य'चं लग्न केवळ एक जाहिरातीच्या शूटसाठी होतं. पण ही जाहिरात किर्लोस्करांची होती. तर त्यांचा थाटसुद्धा तसाच होता. दुसरं जोडपं 'आकाश-वसुचं' असून त्यांच्या नात्याची सुरुवात वसुच्या मनात नसतानादेखील केवळ सासू सासऱ्यांच्या विनंतीखातर झाली.
या लग्नात संगीत पासून ते लग्नापर्यंत सर्व कार्यक्रम सुंदरपणे रचले गेले होते. लाल आणि पिवळ्या रंगाच्या सहावारी नेसून, केसात लाल-पिवळे गुलाब माळून वसु नवरी रूपात सजली होती. तर आकाशने हलक्या पांढऱ्या रंगाच्या शेरवानी सोबत एक लाल रंगाचा शेला खांद्यावर ओढला होता.
तिसरं आणि सर्वात भव्य लग्नसोहळा ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे ती म्हणजे एजे आणि लीलाचं लग्न. इथे सगळं काही शाही होतं. अभिराम जहागीरदारचं लग्न होतं, त्यामुळे संपूर्ण सजावटीत भव्यता दिसून येत होती. लग्नाची सात वचनं एका सुंदर रांगोळीमध्ये लिहिली गेली होती.
नवदेव आणि नवरी सोनेरी रंगांच्या पोशाखात सजले होते. लीलाच्या लूकची खास गोष्ट म्हणजे तिच्या कमरेत बांधलेला सप्तपदीचा पट्टा. लग्नात जरी काही कमी नसली तरी पण जेव्हा नवरीचा चेहरा त्या ओढलेल्या पदरामधून सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होईल हे बघण्यासारखं असेल.