नवी दिल्ली: अखेर शिवसेनेत (shivsena) फुट पडली आहे. शिवसेनेच्या 12 खासदारांनी लोकसभेत वेगळा गट तयार केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. या खासदारांनी लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्याचा आणि त्या गटाचे नेते म्हणून राहुल शेवाळे (rahul shewale) यांची नियुक्ती करण्याचं पत्रं दिलं आहे. तसेच भावना गवळी या आमच्या गटाच्या मुख्यप्रतोद असल्याचंही पत्रात नमूद केलं आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यानंतर आता 19 पैकी 12 खासदारांनीही बंड केल्याने शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप आला आहे. खासदारांनीही वेगळी चूल मांडल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) दिल्लीत आले आहेत. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. यावेळी हे 12 खासदारही त्यांच्यासोबत असतील असं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईतील राजकीय घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचे 12 खासदार फुटणार असल्याची कालपासून चर्चा होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. 12 खासदारांनी आपला वेगळा गट निर्माण केला आहे. या खासदारांनी तसं लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्रं देऊन राहुल शेवाळे हे लोकसभेतील आपले गटनेते आणि भावना गवळी या मुख्यप्रतोद असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन सोबत चाललो आहोत. या विचारांना जुळून आम्ही शिंदेंसोबत जात आहोत. आमचा काही गट नाही. खासदारांनी निर्णय घेतला आहे. आमचा गटनेता विनायक राऊत होते. आता राहुल शेवाळे आमचे गटनेते करावे असं पत्रं लोकसभा अध्यक्षांना दिलं आहे. त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आमची भूमिका स्पष्ट होणार आहे, असं नाशिकचे शिवसेनेचे बंडखोर खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं.
आम्ही सर्व 12 खासदारांनी गटनेतेपद शेवाळे यांना द्यावं हीच मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय आल्यावर पुढील भूमिका स्पष्ट करू. आपली नैसर्गित युती ज्यांच्याबरोबर आहे. त्यांच्यासोबत 25 वर्ष राहिलो. आताही त्यांच्यासोबत राहावं अशी आमची इच्छा होती. अडीच वर्षापूर्वी अनैसर्गिक सरकार आलं. त्यावेळी अनेक वेगळे अनुभव आले. त्यामुळे खासदार अस्वस्थता होती. ही आघाडी घातक ठरेल असं वाटत होतं. त्यामुळे शिंदेंनी पहिलं पाऊल टाकलं आणि त्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळू लागला, असं हेमंत गोडसे म्हणाले.