मुंबई : देशात आचारसंहिता लागू झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत. त्यातच आता निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र भाजपकडून वारंवार आचारसंहितेचा भंग केला जातो आहे. त्यात मोदींनी दूरदर्शनवर केलेलं भाषण, नमो टीव्हीवरुन सर्रास भाजपचा केला जाणारा प्रचार, चौकीदार या मोदींच्या प्रचार गाण्यात सैनिकांचा केलेला वापर, मोदी चित्रपटावर निवडणूक आयोगानं बजावलेली नोटीस, एअर इंडिया आणि रेल्वेच्या तिकिटांवर मोदींचा फोटो यावर मोदींना सुनावलेली नोटीस, अशा अनेक कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.
पहिला दणका : आचार संहिता फक्त नावालाच!
31 मार्च रोजी ‘मै भी चौकीदार’ हे नरेंद्र मोदींचं प्रचाराचं कॅम्पेनिंग दूरदर्शन वाहिनीवर दीड तास प्रसारित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी दीड तास भाषण केलं होतं. यामुळे निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगानं मोदी सरकारकडे उत्तर मागितलं आहे.
दुसरा दणका : ‘नमो टीव्ही’ला निवडणूक आयोगाची नोटीस
दुसरीकडे निवडणूक जाहीर होताच, ‘नमो टीव्ही’ चॅनल हे सर्वत्र दिसतंय. हे चॅनल टाटास्काय, डीटीएच, एअरटेल, रिलायन्स अशा सर्व माध्यमांवर सर्रासपणे दाखवला जातो आहे. अन् त्यावर आचारसंहिता चालू असताना देखील मोदींची भाषणं आणि भाजपचा प्रचार केला जातो आहे. त्यामुळे विरोधकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.
तिसरा दणका : ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेलाही झटका!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेला देखील निवडणूक आयोगाने झटका दिला आहे. त्याचबरोबर हा प्रचाराचा व्हिडिओ परवानगी न घेताच सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. विशेष बाब म्हणजे, सर्व पक्षांना लष्कराच्या कारवाईचा आणि त्यांच्या फोटोंचा वापर न करण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाकडून देण्यात आली होती. मात्र, यानंतरही भाजपाने या व्हिडिओमध्ये जवानांचा वापर केलाय. यामुळे निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
चौथा दणका : सुप्रिम कोर्टात काय होणार?
मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ सिनेमाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगान क्लिन चिट दिलीय. निवडणुक आयोगाच्या म्हणण्यानुसार हा सिनेमा आचारसंहितेच उल्लंघन करत नाही. मात्र हे प्रकरण आता सुप्रिम कोर्टात गेलंय. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर गेलीय.
पाचवा दणका : ‘मिशन शक्ती’मुळे मोदींची डोकेदुखी वाढली!
लोकसभेची निवडणूक अवघ्या चौदा दिवसांवर आली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाला उद्देशून केलेले भाषण राजकीय वादात सापडलंय. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशवासीयांना ‘माहिती’ देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले असून त्यांच्या या ‘राजकीय कृती’चा विरोधकांनी जोरदार समाचार घेतलाय.
सहावा दणका : तिकीटांवरुन मोदींचा फोटो का हटवला नाही ?
याचबरोबर रेल्वे आणि एअर इंडियाच्या तिकिटांवर झळकणाऱ्या फोटोंना निवडणूक आयोगानं आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचं सांगीतलं. यासंबंधी निवडणूक आयोगाने रेल्वे मंत्रालय आणी हवाई वाहतूक मंत्रालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आचारसंहिता चालू झाली तरी देखील तिकीटांवरुन मोदींचा फोटो का हटवला गेला नाही आणि फोटो लावलेली तिकिटांचं का जारी होत आहेत, अशी विचारणा निवडणूक आयोगानं केली आहे.
सतत आचारसंहितेचा भंग, भाजप दंग
एकंदरीत पाहता भाजपकडून आचारसंहितेचा वारंवार भंगकेला जातोय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी भाजपाच्या अडचणींत वाढ झालीय. त्याचबरोबर भाजपाच्या आचारसंहिता भंगाच्या अशा कारवायांवर निवडणूक आयोगानं जोरदार सर्जिकल स्ट्राईक केलंय असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही.
निवडणुकीच्या तारखा जाहीर :
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.