मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासमताच्या बाजूने 164 मते पडली तर विश्वासमताच्या विरोधात 99 मते पडली. यावेळी चार आमदार तटस्थ राहिले. त्यामुळे आजपासून राज्यात शिंदेशाही सुरू झाली आहे. एक साधा रिक्षावाला, शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री असा एकनाथ शिंदे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे अभिनंदनाच्या ठरावावर बोलायला उभे राहिले. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा हा संघर्ष विधानसभेत ऐकवला. शिंदे यांच्याबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टीही त्यांनी सांगितल्या. शिवसेनेत (shivsena) असताना शिंदे यांनी केलेली आंदोलने, मास लिडर म्हणून त्यांचा झालेला उदय, लोकांमध्ये मिसळणारा नेता, शब्दाला जागणारा माणूस, दिलदार मित्रं, उत्तम प्रशासक, कार्यकुशल मंत्री आणि हळवा माणूस… अशा शिंदे यांच्या विविध प्रतिमा त्यांनी उलगडून दाखवल्या.
एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी माझ्या सरकारमध्ये कार्यभार स्वीकारला. तेव्हा काहींना वाटायचं, की हे खातं देऊन त्यांचे पंख छाटले. जेव्हा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची संकल्पना मी मांडली. त्यांना घेऊन बसलो, त्यांना सांगितलं की माझी इच्छा आहे की हा महामार्ग व्हावा. तिथे प्रत्यक्ष ग्राऊंडवर जाऊन शिंदे यांनी समस्या सोडवल्या. तिथले अडथळे दूर केले. ज्या व्यक्तीनं यात सातत्यानं काम केलं, त्या व्यक्तीचं नाव एकनाथ शिंदे आहे. आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांनी अतिशय उत्तम काम केलं, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
सीमाप्रश्नावर जे आंदोलन झालं, त्या आक्रमक आंदोलनात शिंदे यांनी एक नेता म्हणून आपला दबदबा तयार केला. 1986 साली त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. 40 दिवस बेलारीच्या जेलमध्ये सीमाप्रश्नी त्यांनी कारावास भोगला. त्यातून एक मोठं व्यक्तिमत्त्व तयार झालं. ठाण्यातही त्यांनी मोठा मोर्चा काढला, असं त्यांनी सांगितलं.
महालक्ष्मी पुरात अडकली होती. तेव्हा शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचं नाव माझ्यासमोर आलं. त्या दिवशी उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता. मी म्हटलं मी उद्धवजींना सांगतो. सर्व कार्यक्रम सोडून जा. ते बोटीतून गेले. बोटीत साप येत होते. तरीही ते गेले आणि लोकांना पुरातून बाहेर काढलं, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी फडणवीस यांनी कोल्हापुरातील पुराचीही एक आठवण सांगितली. कोल्हापूरच्या पुरातही त्यांनी जीवनावश्यक वस्तूही त्यांनी लोकांना पुरवल्या, असं त्यांनी सांगितलं.
रोज ते आजही 400 ते 500 लोकांना भेटतात. मी त्यांना सांगितलं आता वेळ पाळा. कारण ते पब्लिकमधील माणूस आहेत. लोकांमध्ये रमणारे आहेत. लोकं दिसली तर त्यांची समस्या सोडवूनच ते निघतात. पण आता ते वेळेवर यायला लागले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
कमी बोलायचं आणि काम जास्त करायचं हे त्यांचं काम आहे. त्यांच्यात प्रचंड पेशन्स आहेत. आनंद दिघे यांच्या तालमीत ते वाढले आहेत. त्यामुळेच त्यांच्यात संयमीपणा आला आहे, असं त्यांनी सांगितलं.
कुणाच्या घरी छोटा कार्यक्रम असला तरी ते तिथे जातात. उशिरा का होईना ते जातात. रात्री अपरात्रीही जातात. एकदा एका कार्यकर्त्याने कार्यक्रम घेतला होता. त्यांना चिपळूणला जावं लागलं होतं. कार्यकर्ता म्हणाला साहेब पाच मिनिटासाठी या. माझी बेईज्जती होईल. ते सहा तास प्रवास करून चिपळूणच्या दिशेने गेले होते. त्यानंतर ते कार्यकर्त्यासाठी सहा तास प्रवास करून मागे फिरले. आणि कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावून पुन्हा सहा तास प्रवास केला, अशी आठवणही त्यांनी सांगितलं.
परिस्थितीमुळे ते शिकले नाही. पण शिकण्याची जिद्द होती. त्यामुळे ते वयाच्या 56व्या वर्षीही शिकले. त्यांनी बीएची परीक्षा दिली आणि 77 टक्के गुण घेऊन ते उत्तीर्ण झाले. आपलं शिक्षण पूर्ण झालं नाही. याची रुखरुख लागल्यानेच त्यांनी मुलाला शिकवलं. डॉक्टर केलं, असा गौरव त्यांनी केला.
त्यांची दोन मुलं अपघातात गेली. तेव्हा संपूर्ण कुटुंब तुटून गेलं होतं. जीवनातलं सर्व संपलं असा भाव त्यांच्या मनात निर्माण झाला होता. तेव्हा आनंद दिघेंनी त्यांना सावरलं आणि त्यांच्यातील नेतृत्व उभं केलं. स्वत: पेक्षा समाजाचं काम केलं पाहिजे, अशी शिकवण त्यांना दिली, असंही त्यांनी सांगितलं.
त्यांना शेतीची आवड आहे. त्यामुळे त्यांना थकवा येतो तेव्हा ते गावी जातात. अलिकडे त्यांचा थकवा मिटवण्यासाठी नातू आहे. नातवामध्ये राहतात, असंही त्यांनी सांगितलं.