मुंबई: राज्य सरकारने मुंबई महापालिकेतील (bmc) घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळातील कामाचीही चौकशी सुरू आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या (election) तोंडावर शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे. दिलखुलासपणे चौकशी करा, आनंदच आहे. आमची कामं जनतेसमोर आहेत, असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिलं आहे. मंत्र्यांना बंगले दिलेत, पण जिल्हे दिलेले नाहीत. पालकमंत्री आज गरजेचे आहेत. पण गद्दार सरकारचं लक्ष स्वतःवरच आहे, जनतेवर नाही, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधताना केली.
हे सरकार स्थापन झालं तेव्हा दोन जण मंत्री झाले. मंत्री ठरवायला 42 दिवस लागले. पण जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाही. खोके ओके हे काही झोमण्यासारखं नाही. मुख्यमंत्र्यांची भाषा योग्य नाही. या आमदावर कुणाचा अंकुश नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. विभागाच्या पुनर्रचनेत कुणीही पाठिंबा दिला तरी चालेल, कधीही निवडणुका घ्या आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. आधी नियुक्ती केली जाते मग थांबवली जाते. हे सरकार फक्त स्वार्थासाठी सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ज्या बाळासाहेबांच्या मुलाने सर्व काही दिलं त्याच्या पाठित खंजीर खुपसायचा. त्यामुळे यांच्यासाठी ‘गद्दार’हा शब्दच योग्य आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.
तिकडचे 2-3 आमदार गुंडागिरीची भाषा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काल सभागृहात धमकी दिली. आज पायऱ्यांवर जे लोकं होते त्यांना काही मिळालं नाही. ते त्यांचं दु:ख असेल. त्यांना योग्य शब्द आहे तो म्हणजे गद्दारच आहेत, अशी टीका त्यांनी केली.
बीडीडी चाळीत पोलिसांना घरे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्य सरकारने घेतला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. बीडीडी चाळीचा प्रश्न गेले 25 वर्ष रखडला होता, तो आम्ही मार्गी लावला. 25 लाख एवढी कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणली. अजून जीआर निघालेला नाही. सरकारने लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे, असंही ते म्हणाले.