मुंबई: आरेत कारशेड (Mumbai metro car shed) उभारण्याच्या राज्यसरकारच्या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीही रस्त्यावर उतरली आहे. आम आदमी पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज आरे परिसरात (Metro Car Shed) जोरदार निदर्शने केली. मेट्रो- 3 च्या कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठविली आहे. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. आम्ही आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, असा इशारा आम आदमी पार्टीचे नेते रुबेन मस्करेन्हास यांनी दिला. आम्हाला केवळ आरेच वाचवायचं नाही तर आरेतील हिरवळ, जंगल आणि जैवविविधताही वाचवायची आहे. तसेच आरेत प्रदूषण होऊ नये यासाठी हा प्रकल्प होता कामा नये. मुंबईत मोकळा श्वास घेण्यासाठी एक तरी जागा शिल्लक ठेवा, असं आवाहन आपच्या (Aam Aadmi Party) कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला केलं.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो- 3 चे कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात करता यावी यासाठी राज्य सरकारने गुरुवारी आरेतील कामावरील बंदी उठविली. याचा निषेध करण्याकरीता आम आदमी पार्टीने आरे येथील पिकनिक पॉईंट येथे आंदोलन केले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे नेते, कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला होता. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
मुंबईकरांचे फुफुस असलेले आरे वाचविण्याकरिता पुन्हा एकदा आम आदमी पार्टी मुंबईकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. मुंबईला दोन्हीची गरज आहे आणि दोन्ही मिळू शकतात. ही केवळ राजकीय इच्छाशक्तीची बाब आहे, अशी टीका रुबेन मस्करेन्हास यांनी केली.
आम आदमी पक्षाचा भविष्यातही शांततापूर्वक लोकशाही पद्धतीने आरेमध्ये मेट्रो कार सेट 3 चा विरोध सुरू राहणार आहे. मात्र विकास कामाला आमच्या विरोध नाहीच. पण त्याचबरोबर आरेमधली हिरवळ किंवा जंगल ही सुद्धा आम्हाला वाचवायचे आहे. म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, असं आम आदमी पक्षातर्फे म्हटलं जातंय. मात्र मेट्रो कार शेड 3 कांजूरमध्ये व्हावे, अशी त्यांची मागणी आहे. आम्ही यापूर्वीही कोर्टात गेलो होतो. गरज भासली तर भविष्यात ही कोर्टात जाणार, असा इशाराही आपने दिला.