मुंबई : कामाऐवजी नेहमी विधानांनी चर्चेत राहणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तारांनी पुन्हा एकदा अभद्र भाषा वापरली. आणि इकडे मुंबईत राष्ट्रवादीनं सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या. मुंबईनंतर ठाण्यात अब्दुल सत्तारांचा पुतळा जाळण्यात आला. नंतर तिकडे औरंगाबादेतही सत्तारांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. वादाचा विषय होता गुवाहाटीत 50 खोके घेतल्याच्या आरोपांचा. मात्र त्यावर बोलताना सत्तारांनी गलिच्छ शब्द उच्चारला, आणि त्यावर स्पष्टीकरण देताना पुन्हा तोच शब्द वारंवार वापरला.
यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. आणि सत्तेमधल्या अनेकांनीही सत्तारांच्या विधानाचा निषेध केलाय. राष्ट्रवादीनं सत्तारांच्या घराबाहेर आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केली. सत्तारांना माफी मागण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटमही दिला.
या प्रकरणावर सर्व स्तरातून तीव्र संतापानंतर महिलावर्ग दुखावला असेल तर खेद व्यक्त करतो, असं अब्दुल सत्तार म्हटले.
यातला विरोधाभास म्हणजे जेव्हा स्वतः सरकारमधले आमदार रवी राणा गुवाहाटीवरुन पैशांचा आरोप करत होते, तेव्हा सरकारमधले अनेक मंत्र्यांचं त्यावर मौन होतं. जेव्हा राणा आणि बच्चू कडू दोन्ही नेत्यांनी पातळी सोडली होती, तेव्हाही हा गैरसमजातून झालेला वाद आहे, सरकार तो वाद मिटवेल, असं मंत्री म्हणत होते. मात्र तोच आरोप विरोधकांनी केल्यावर मंत्री अब्दुल सत्तारांचा तोल गेला.
अब्दुल सत्तारांमुळे शिंदे-भाजप सरकारची कोंडी होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही नाही. याआधी जेव्हा हिंदुत्वाचं कारण देत शिंदे गुवाहाटीला गेले, तेव्हा आम्ही बिर्याणी खाण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचं सत्तार म्हटले होते.
गुवाहाटीनंतर जेव्हा शिंदे गट गोव्यात आला, तेव्हा सुद्धा एका व्यक्तीनं सत्तारांना फोनवरुन पैसे घेतल्याचा आरोप केला. तेव्हा सुद्दा दोन्ही बाजूंनी शिव्यांची लाखोली वाहिली गेली.
सरकार स्थापनेनंतर मला निवडणुकीत कुत्र्याचं चिन्ह जरी मिळालं, तरी सिल्लोडमध्ये निवडून येऊ शकतो, असं सत्तार मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाले.
मंत्रीमंडळ विस्ताराच्या आदल्याच रात्री अब्दुल सत्तारांचं नाव टीईटी घोटाळ्यात घेतलं गेलं.
कृषी मंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार नुकसानीच्या पाहणीसाठी बांधावर आले, आणि शेतकऱ्यांना फक्त ओके हा शब्द वापरत निघून गेल्यानंतरही सत्तार चर्चेत राहिले होते.
काही वर्षांपूर्वी बांधाच्या वादावरुन दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी अब्दुल सत्तारांनी शेतकऱ्यांच्या भांडणात हनुमानावरुन अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ चर्चेत आला. जो तेव्हा खुद्द नितेश राणेंनी ट्विट केला होता.
काँग्रेसमध्ये असताना सत्तारांचं तिकीट कापलं म्हणून सत्तारांनी औरंगाबाद काँग्रेस कार्यालयातल्या खुर्च्या घरी उचलून नेल्या होत्या. कार्यालय पक्षाचं असलं तरी खुर्च्या माझ्या मालकीच्या आहेत म्हणून सत्तारांची ही बातमी देशभर गाजली होती.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात अब्दुल सत्तारांनी सिल्लोडमधून मुंबईत माणसं आणली. मात्र त्यापैकी अनेक लोकांना ग्रामपंचायतीची मिटिंग आहे म्हणून मुंबईत आणलं गेल्याचेही काही व्हिडीओ समोर आले होते.
सरकार स्थापनेनंतर केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधी देणार असल्याची घोषणा सत्तारांनी करुन टाकली. मात्र जो निर्णय झालाच नाही, त्याची घोषणा केल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्तारांची कानउघाडणी केली होती.
सत्तारांमुळे शिंदे-भाजप सरकारची वारंवार गोची होते. हे विरोधकांबरोबरच खासगीत काही सत्तेतले नेतेही म्हणतात. वास्तविक माध्यमांवर बोलताना कुणी अपशब्द वापरला तर तो शब्द बीप करण्याचा प्रघात आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यातला एक मंत्री महिला नेत्याबद्दल काय पातळी सोडून बोलू शकतो, हे लोकांनाही कळायला हवं!