नवी दिल्ली : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यापासून आणि राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचा सरकार आल्यापासून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. निष्ठा यात्रा, संपर्क अभियान, असे अनेक दौरे आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू आहेत. आपल्या प्रत्येक दौऱ्यात आदित्य ठाकरे बंडखोर शिवसेना आमदारांना गद्दारांची उपमा देत आहेत. तसेच हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीच्या मैदानात उतरा, मग कळेल कुणात किती दम आहे, जनता कोणाच्या पाठीमागे आहे, असे आव्हान रोज देत आहेत. त्यानंतर आता बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे आदित्य ठाकरे विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच आओ देखे जरा किसमें कितना है दम म्हणत आदित्य ठाकरे यांना थेट आव्हान दिलंय.
आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबद्दल बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले ज्यावेळेस एवढे चाळीस आमदार बाहेर जातात तेव्हा कॅप्टनने विचार करायला हवा होता. मी तर आता मुख्यमंत्री औरंगाबाद येतील तेव्हा राजीनामा देणार आहे. त्यावेळेस बघू दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे, किस में कितना है दम देखते है, कोण गद्दार आहेत, हे लवकरच कळेल, असे थेट आव्हान त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
तसेच दिल्ली मी वरिष्ठ नेत्यांना भेटणार नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. ते ठरवतील ती भूमिका आम्हाला मान्य असेल, तसेच कोर्टातला निकाल हा आमच्या बाजूने लागेल. शिवसेना आमची आहे आणि धनुष्यबाण हे आमचाच आहे, असे पुन्हा एकदा सत्तर म्हणाले आहेत.
तर राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारा बाबतही त्यांनी भाष्य केले आहे, मंत्रिमंडळाची यादी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे. तीन तारखेच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यासाठी दिल्लीत चर्चा करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे चर्चा करून निर्णय घेतील आणि मंत्रिमंडळ विस्तारात कोर्टाच्या निकालाचा कोणताही संबंध नाही, लवकरात लवकर विस्तार होईल अशी माहिती सत्तार यांनी दिलेली आहे. तसेच दिल्लीत मी अर्जुन खोतकर यांच्याशी चर्चा करायला आलो आहे. त्यांची भूमिका समजून घेऊन लवकरच ते आमच्या सोबत येतील. आम्हाला एकत्र काम करायचं आहे. यासाठी त्यांच्याशी बोलायला आलो आहे, असेही ते म्हणाले.