औरंगाबादः शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलींची नावं टीईटी घोटाळ्यात (TET Scam) आल्यानंतर सर्वच विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर टीका केली जातेय. औरंगाबाद शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही टीका केलीय. ते म्हणाले, ‘जवळपास 8 हजार उमेदवारांचा घोटाळा बाहेर आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींचीही नावं या घोटाळ्यात आली आहेत. या प्रकराची सखोल चौकशी झाली पाहिजे. अब्दुल सत्तारांचाही टीईटी घोटाळ्यात कुठे संबंध आहे का याचीही चौकशी झाली पाहिजे. ज्यांचं या घोटाळ्यात नाव आलंय, ते महाराष्ट्राचे आधी महसूल मंत्री होते, ग्रामविकास मंत्री होते आणि आता यांना कॅबिनेटमंत्री व्हायचंय. त्यामुळे शिक्षण खातं मिळालं तर आणखी चांगली चौकशी होईल, असं वक्तव्य केलं जातंय. मात्र यावर तपास झालाच पाहिजे, अशी मागणी शिवसेना करेल, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय.
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET घोटाळात प्रवेश परीक्षेत पात्र नसलेल्यांना प्रमाणपत्र देऊन नोकरीला लावण्यात आल्याचा आरोप आहे. सदर प्रकरणाची महाराष्ट्र शासनाप्रमाणेच ईडीकडूनही चौकशी सुरु आहे. आता शिंदे गटातील आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचंही नाव या घोटाळ्यात जोडलं जातंय. या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांची प्रमाणपत्र रद्द करण्यात येत आहेत. त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील सुमारे 7 हजार 874 विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत. त्यांना भविष्यात टीईटी देता येणार नाही, अशी बातमी ‘सामना’ने दिली आहे. सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींची नावं यात आली आहेत. सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात त्यांच्या सात शैक्षणिक संस्था असून यातीलच एका संस्थेत त्यांच्या दोन्ही मुली कार्यरत होत्या, असा आरोप केला जातोय.
दरम्यान, या घोटाळ्यात 2019 साली झालेल्या परीक्षार्थींची नावं आहेत. माझ्या मुलीने 2020 मध्ये परीक्षा दिली होती. यासंदर्भात मी साधे पत्रही दिलेले असेल तरी आमच्यावर बिनधास्त कारवाई करा. हा आमच्या बदनामीचा कट असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय.