जालना: शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (arjun khotkar) यांच्या लोकसभेच्या जागेवरून अजूनही तिढा सुटलेला नाही. जालना लोकसभेची जागा सोडण्यास भाजप नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी नकार दिला आहे. जालना लोकसभेची जागा काय दानवेंच्या बापाची आहे का? मी जर जागा सोडली तर पक्ष मला घरी बसवेल, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यामुळे खोतकर यांना जालना लोकसभेची जागा मिळणार नसल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनीही जालना लोकसभेचा राग आळवून या मुद्द्याला पुन्हा हवा दिली आहे. खोतकरांच्या खासदारकीचं काय ते बसवून ठरवू. पण आम्ही खोतकर यांना दिलेला शब्द मोडलेला नाही, असं विधान सत्तार यांनी केलं आहे. त्यामुळे खोतकर यांना जालना लोकसभेची जागा मिळावी म्हणून शिंदे गट अजूनही आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज जालन्यात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे आणि माझ्यात वाद होणार नाही याची सर्व जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची असल्याचं अब्दुल सत्तार यांनी केलंय. सत्तार यांनी खोतकरांना खासदारकीचा शब्द दिला होता. त्यानुसार खोतकरही खासदारकीवर ठाम आहेत. मात्र भाजप आणि दानवे खासदारकी सोडायला तयार नाहीत. मात्र आमच्यात कोणताही वाद होणार नाही याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. आणि खासदारकीचं काय ते आम्ही आमचं बसून ठरवू मात्र शब्द तोडलेला नाही, असंही सत्तार यांनी म्हटलंय. तसेच खोतकरांना खासदारकी द्यायची की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावरून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशीत सर्व माहिती पुढे येईल, असं ते म्हणाले.
रावसाहेब दानवे यांना दोन दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या लोकसभेच्या जागेबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी दानवे चांगलेच भडकले होते. जालना लोकसभेची जागा काय माझ्या बापाची आहे का? असा सवाल करतानाच आम्ही जागा सोडली तर पक्ष मला घरी बसवेल. म्हणतील तुझं पक्षात काहीच काम नाही, असं दानवे यांनी म्हटलं होतं.