अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा झटका, निवडणूक आयोगाने काय दिले तातडीचे आदेश?; सिल्लोडमध्ये काय घडणार?

| Updated on: Nov 03, 2024 | 9:27 AM

निवडणूक आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रातील चुकीच्या माहितीबाबत तातडीची चौकशीचे आदेश दिले आहेत. सत्तार यांच्या विरोधात मालमत्ता लपवण्याचे आरोप आहेत. त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. या चौकशीचा अहवाल अर्ज वैध ठरवण्यापूर्वीच येणार असल्याने सत्तारांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिल्लोडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा झटका, निवडणूक आयोगाने काय दिले तातडीचे आदेश?; सिल्लोडमध्ये काय घडणार?
Abdul Sattar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना मोठा झटका लागला आहे. निवडणूक आयोगाने थेट सत्तार यांच्या शपथपत्रांची तातडीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांचं टेन्शन वाढलं आहे. सत्तार यांची उमेदवारी राहणार की रद्द होणार? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या चौकशीत सत्तार दोषी आढळल्यास सिल्लोडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जिल्हा निवडणूक आयोगाने अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे सत्तार यांची डोकेदुखी वाढली आहे. अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्रात 16 चुकी असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर जिल्हा निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.

अशीही दडवादडवी

अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या निवडणूक शपथपत्रात मालमत्तेची लपवालपवी केली आहे. प्रत्यक्षातील मालमत्ता आणि शपथपत्रात दाखवण्यात आलेली मालमत्ता याच्या तपशीलात तफावत असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तसेच या मालमत्तेवर जे बांधकाम करण्यात आलं आहे, त्याचीही योग्य माहिती देण्यात आली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. सत्तार यांनी चारचाकी वाहन असल्याचं शपथपत्रात नमूद केलं आहे. पण हे वाहन कधी खरेदी केलं त्याची तारीखच दिली नाही. याशिवाय सत्तार यांची जालन्यात मालमत्ता आहे, त्याचा तपशीलही दडवण्यात आल्याचा आरोप या शपथपत्रात करण्यात आला आहे.

उमेदवारी रद्द करा

सत्तार यांनी आपल्या मालमत्तेत ज्वेलरी, वाहने, मालमत्ता याच्यासह विविध सहकारी संस्थांमधील शेअर्सची माहितीही चुकीची देण्यात आली आहे. सत्तार यांनी शपथपत्रात अनेक माहिती दिलेली नाही, दिलेली माहिती एक तर चुकीची आहे आणि अर्धवट आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. त्याची निवडणूक आयोगाने गंभरी दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अर्ज वैध ठरवण्याच्या आधीच हा अहवाल येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी राहणार की जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.