अहमदनगर : मनाने भाजपवासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रत्यक्ष भाजप प्रवेशाला वेग आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार हे नक्की आहे, मात्र ते एकटेच येणार की काँग्रेसचे आणखी आमदार घेऊन येणार हा प्रश्न आहे. राधाकृष्ण विखेंसोबत सध्या काँग्रेसच्या नाराज आमदारांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. आधी औरंगाबादचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यापाठोपाठ आता साताऱ्याच्या काँग्रेस आमदार जयकुमार गोरे हे सुद्धा विखेंच्या भेटीला दाखल झाले.
माण खटावचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी संगमनेर शहरात राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकाच गाडीतून विखेंसोबत प्रवास सुरु केला. दोन दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनीही विखे पाटलांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सूचक विधान केलं होतं.
विखेंसोबत कोण कोण काँग्रेस सोडणार?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार हे नक्की झालंय. पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधून अजून किती जण जाणार याबाबत आता चर्चा रंगली आहे. कारण, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत सूचक विधान केलंय. विखेंना मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी त्यांचा निर्णय अंतिम असेल. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेसला राज्यात सर्वात मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.
अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीच बंडखोरी केली होती. औरंगाबादमधून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गावात एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे आणि अब्दुल सत्तार एका मंचावर होते. या कार्यक्रमात त्यांनी विखेंचा निर्णय अंतिम असेल, असं सांगितलं होतं.
जयकुमार गोरेंची काँग्रेसविरोधी भूमिका
दरम्यान, जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माढ्याच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता.
लोकसभा निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यातील माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी महायुतीच्या रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीन दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल.” असं आमदार जयकुमार गोरे म्हटले होते.
संबंधित बातम्या
काहीही अंधारात नाही, सांगून करणार, राधाकृष्ण विखे राजीनामा देणार
राधाकृष्ण विखेंसह काँग्रेसचे आमदार आणि अनेक नेतेही भाजपच्या वाटेवर?
सुजय यांचा विजय मोदी लाट आणि धनशक्तीचा : संग्राम जगताप
विखे पाटलांसह काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाईची शक्यता
लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर मदत, विधानसभेबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणतात…
विखे पाटलांसह महाराष्ट्रात काँग्रेसच्या 12 आमदारांचा पक्षापासून ‘दुरावा’