मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल? याचा नेम नसतो. दोन दिवसांपूर्वीच एक मोठा भूकंप झाला. काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी अचानक भाजपामध्ये प्रवेश केला. ते भाजपाच्या वाटेवर असल्याची कित्येक दिवसापासून चर्चा होती. पण अचानक त्यांनी भाजपात प्रवेश करुन सर्वांना धक्का दिला. अशोक चव्हाण हे एक मोठ नाव आहे. महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं आहे. असा नेता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असेल, तर निश्चितच पक्षासाठी तो एक धक्का आहे. अशोक चव्हाण यांच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत खदखद समोर आलीय. अशोक चव्हाणच नाही, काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देतील अशी चर्चा आहे.
दोन दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले, ‘आगे-आगे देखो होता हैं क्या’. आता आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जातय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकार बाळासाहेब थोरात यांना दिल्याने नाना पटोले अस्वस्थ असल्याच म्हटलं आहे.
कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज का?
“नाना पटोले यांच्या कारभाराविरोधात अनेक नेत्यांनी त्यांची हायकमांडकडे तक्रार केली. त्यामुळे नाना पटोले भाजपात जाणार. भाजपात त्यांना मोठं पद मिळणार” असा दावा प्रशांत पवार यांनी केलाय. प्रशांत पवार हे एकेकाळचे नाना पटोले यांचे निकटवर्तीय आहेत. नाना पटोले यांची सुरुवात काँग्रेसमधून झाली. 2014 साली ते भाजपाच्या तिकीटावर खासदार झाले. पण पुढे नरेंद्र मोदी यांना विरोध करुन ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं. पण त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे.