सध्या संपूर्ण राज्यामध्ये बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. भाजप नेते आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरला आहे. रोज माध्यमांशी बोलताना सुरेश धस अनेक गौप्यस्फोट करत आहेत. सुरेश धस बोलताना सतत आकाचा उल्लेख करतात. आकाची बीडमध्ये दहशत आहे, असा धस यांचा दावा आहे. सुरेश धस यांनी अजून आकाच नाव उघड केलेलं नाही. पण टीका करताना त्यांचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असतो. याच धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी काही अभिनेत्रींची नाव घेतली. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी यांची नाव त्यांनी घेतली. प्राजक्ता माळी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.
“आकाची इथं 100 एकर जमीन आहे, तिकडे जमीन आहे, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही त्यांचे सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा”, असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता. सुरेश धस यांच्या या वक्तव्यावर प्राजक्ता माळी हिने आक्षेप घेतला आहे. प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर कारवाई करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर ट्रोल
दरम्यान आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी हिने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ती पत्रकार परिषदेद्वारे उत्तर देणार आहे. ‘माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार’ असल्याचे प्राजक्ता माळी यांनी सांगितले. मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. प्राजक्ता माळी थेट पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतील. उलट-सुलट सुरु असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळेल. प्राजक्ता माळी ही सर्वसामान्य मराठी कुटुंबातून पुढे आलेली मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिला सोशल मीडियावरुन सातत्याने ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे आज भाजप आमदार सुरेश धस यांनी तिचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.