लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘धर्मवीर’ चित्रपटातील एक सीन राजकीय मुद्दा बनला आहे. ‘धर्मवीर’ हा दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील चित्रपट आहे. दोन वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड गाजला. ‘धर्मवीर’ चित्रपटात प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. ‘धर्मवीर’ चित्रपट पुन्हा चर्चेत येण्यामागच कारण आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला एक खुलासा. “आनंद दिघे साहेबांनी सांगूनही विचारेंनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला नव्हता. राजन विचारे हे आनंद दिघेंचे नकली शिष्य आहेत. धर्मवीर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व खरं समोर येईल”, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
“चित्रपटात दाखवलं होतं की राजन विचारे हे स्वत:हून आले आणि त्यांनी राजीनामा दिला. पण हे सगळं खोटं आहे. दिघे साहेबांनी त्याला राजीनामा द्यायला सांगितला, तेव्हा त्याने तो दिला नव्हता” असं एकनाथ शिंदे म्हणाले. आता शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. “राजन विचारे आणि आम्ही सर्व त्यावेळेस एकत्र होतो. ग्लॅमर द्यावं म्हणून तो सीन क्रिएट केला होता. मात्र सत्य परिस्थिती समोर येणार आहे” असं मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.
‘हे उद्धव ठाकरे यांना एकदा विचारा’
‘राजन विचारे यांनी इतके वर्ष तोंड का नाही उघडले?’ असा सवाल त्यांनी केला. “आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे खरे विचार लोकांसमोर एकनाथ शिंदे यांनी मांडले. ठाकरे गट स्वार्थासाठी काम करत आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यामध्ये कुठल्या वास्तूला आनंद दिघे यांचे नाव द्यायचे नाही असं सांगितलं होतं. राजन विचारे हे कट्टर शिवसैनिक आहेत, तर मग दसरा मेळाव्यात आनंद दिघे यांची प्रतिमा का नाही लावली? उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात दिवंगत नेते आनंद दिघे यांची प्रतिमा का लावत नाही? हे राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना एकदा विचारावे” असं मीनाक्षी शिंदे म्हणाल्या.
=