मुंबई : “8 हजार कोटीच अॅमब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळालय? त्यात अशा प्रकरणात किती माफिया मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित आहेत ते लवकर बाहेर येईल. हे काम देण्यासाठी ज्या बाळाराजांकडून दबाव आला, त्याच्यात ते एकटे नसून मुंबई-पुण्यातले माफीया लाभार्थी आहेत” असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. “सरकारी पैशाने गुंडगिरी वाढवायची, सरकारी पैशाने माफीयाना बळ द्यायच. पोलीस गुंडांचे सरंक्षक झाले आहेत. शिंदे टोळीत पोलीस आणि गुंड एकत्र आहेत. मुंबई-ठाण्यात ज्या पोलिसांच्या नेमणूका झाल्या, ते शिंदे सेनेचे सदस्य आहेत. त्यांचा हिशोब 2024 निवडणुकीनंतर होईल. त्यांची यादी तयार आहे” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
“भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला, त्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाच नाव आलं आहे. पोलिसांनी शिंदे यांची चौकशी केली पाहिजे. गणपत गायकवाड सांगतायत, एकनाथ शिंदेमुळे मी गोळीबार केला. माझे कोट्यवधी रुपये त्यांच्याकडे पडले आहेत. तरी या राज्यातला कायदा-पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. तेच झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते, पण महाराष्ट्रात गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जात नाही, हे दुर्देव आहे” असं संजय राऊत म्हणाले.
‘रोज दीड वर्ष गुंडगिरीच्या बातम्या’
“अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा नंगानाच पहायला मिळाला, तो अस्वस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. रोज दीड वर्ष गुंडगिरीच्या बातम्या कानावर येत आहेत. या राज्याचे गृहमंत्री कुठे अदृश्य आहेत. गृहमंत्री विदर्भात भाजपा कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत फिरत आहेत. महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा कधी करणार?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
‘कठोर कारवाई करणार, कोणावर?’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा नियोजित आहे. त्या बद्दल संजय राऊत यांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, “महाराष्ट्रात खून करण्याची नवीन सुपारी घेण्यासाठी ते दिल्लीला चाललेत का?. कायदा-सुव्यवस्थेबद्दल एका शब्दाने बोलले नाहीत. कठोर कारवाई करणार, कोणावर? आमच्या शिवसैनिकांवर, गुंडांवर कारवाई नाही का? हे गुंड तुमचे कोण लागतात?”