“मी फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाची मागणी केली होती. एक MLC, एक मंत्रिपद आणि काही महामंडळ अशी मी फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. महायुतीला मिळालेल्या यशात आमच्या पक्षाचा मोठा वाटा आहे. फडणवीस यांनी आम्हाला का टाळलं ते माहीत नाही. आम्ही त्यांची भेट घेऊन बाकी असलेल्या खात्याची मागणी करणार. आम्ही तुम्हाला प्रामाणिक मत देतो, मग मंत्रीपद देत नाहीत. देशात माझ्या पक्षाचे आमदार, कार्यकर्ते आहेत. माझी नाराजी आहे, आमचा फडणवीस यांनी विचार करावा” अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी मनातल्या भावना बोलून दाखवल्या.
“आम्हाला मंत्रिपद मिळत नसेल, तर आता राहिलेल्या MLC मधे संधी द्यावी, महामंडळात आम्हाला संधी द्यावी. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार पुढं मंत्रिपदासाठी आमचा विचार व्हावा. आमचे कार्यकर्ते काही मोठे उद्योजक, दोन नंबर धंदे करणारे नाहीत. त्यामुळं आम्हाला काही ED आणि बिडीची भीती नाही” असं रामदास आठवले म्हणाले. छगन भुजबळांच्या नाराजीवर सुद्धा रामदास आठवले बोलले. “अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचा विचार करायला हवा होता. ते पुढे विचार करतील असं वाटतं” असं रामदास आठवले म्हणाले.
‘ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशाच्या बाहेर जावं’
“परभणीत संविधाच पुस्तकं ठेवलं होतं, त्याचा अपमान एका व्यक्तीने केला होता, त्या व्यक्तीला पकडलं आहे. परभणीत सोमनाथ सुर्यवंशी नावाच्या व्यक्तीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. झालेली घटना दुर्देवी आहे. संविधान हे देशाचं संविधान आहे. ज्यांना संविधान मान्य आहे, त्यांनाच देशात राहण्याचा अधिकार, ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी देशाच्या बाहेर जावं ही आमची भूमिका आहे” असं रामदास आठवले म्हणाले.
‘मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, त्यात त्यांचा मृत्यू’
“परभणीत जातीय दंगल व्हावी अशी भूमिका नव्हती. मी देखील परभणीला भेट दिली, जिल्हाधिकारी आणि SP यांच्याशी माझी चर्चा झाली. सोमनाथ सुर्यवंशी यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांमुळे झाला, त्या पोलिसांना तत्काळ निलंबित करावं” अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.