Devendra Fadnavis : शपथविधीनंतर प्रथमच शिंदेंच्या भूमिकेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा

| Updated on: Dec 06, 2024 | 2:01 PM

Devendra Fadnavis : शपथविधीनंतरही एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. काल शपथविधीला तीन तास उरलेले असताना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार झाले. त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या पक्षाचे आमदार वर्षावर गेले होते. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या बैठकीत काय घडलं? त्यावेळी एकनाथ शिंदेंची भूमिका काय होती? या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

Devendra Fadnavis : शपथविधीनंतर प्रथमच शिंदेंच्या भूमिकेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा खुलासा
shinde and fadnavis
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अखेर काल 12 दिवसांनी शपथविधी झाला. महायुतीला मोठा जनादेश मिळूनही सरकार स्थापनेला विलंब होत असल्याने उलट-सुलट चर्चा सुरु होत्या. महाविकास आघाडीला टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं होतं. अखेर काल 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी होण्याच्या अगदी तीन तास आधीपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. अखेर दुपारी दोन वाजल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे स्पष्ट झालं. या शपथविधी सोहळ्यानंतर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेसंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. महायुतीने 230 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला. या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी कायम रहावे, अशी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. निकालानंतर काही दिवस एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी त्यांच्या पक्षाचे नेते जाहीररित्या बोलून दाखवत होतं. यावरुन इतका संभ्रम वाढला की, एकनाथ शिंदे यांनी स्वत: ठाण्याच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापनेत माझ्याकडून कुठलीही अडचण येणार नाही असं सांगितलं. भाजपला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिल्यानंतर मग, एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी अडून बसल्याच चित्र निर्माण झालं. आता देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत या बद्दल खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले?

“मुख्यमंत्री भाजपचा होणार हे एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पहिल्याच बैठकीत मान्य केलं होतं” असं देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘पक्षाने 137 जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होणार हे पक्षाने ठरवलं होतं’ असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दोन मतप्रवाह होते. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं, असं अनेकांच मत होतं. पण काहींच असं सुद्धा मत होतं की, एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी कॉर्डिनेशन कमेटीच चेअरमन बनावं”

पहिल्या बैठकीत काय ठरलेलं?

“आमच्या पहिल्या बैठकीतच ठरलेलं, मुख्यमंत्री भाजपचा झाला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्वत: होकार दिलेला. ते उपमुख्यमंत्री बनण्यासाठी तयार होते. पण पक्षात काही नेते, कार्यकर्ते असतात, त्यांची इच्छा असते की, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनावा. आमच्या नेत्याचा मान असावा, अशी कार्यकर्त्यांची भावना असते. पण आमच्या मनात कुठलाही संशय नव्हता. माझे स्वत:चे एकनाथ शिंदेंसोबत चांगले व्यक्तीगत संबंध आहेत” असं देवेद्र फडणवीस म्हणाले. “मी पद स्वीकारलं पाहिजे असं मला माझ्या पक्षाने सांगितलं. मी ते ऐकलं. एक वास्तव हे सुद्धा आहे की, पक्षाचा मजबूत माणूस सरकारमध्ये नसेल, तर पक्ष चालत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.