गजानन कीर्तिकर यांची पदे मिळवण्यासाठी ठाकरे गटात स्पर्धा, 6 नेत्यांची नावे चर्चेत; कुणाच्या गळ्यात पडणार माळ?

| Updated on: Nov 12, 2022 | 12:44 PM

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेते पदासाठीच्या स्पर्धेत अनिल देसाई यांच्यासह विनायक राऊत, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, रवींद्र मिर्लेकर, विश्वनाथ नेरूरकर यांचीही नावे चर्चेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

गजानन कीर्तिकर यांची पदे मिळवण्यासाठी ठाकरे गटात स्पर्धा, 6 नेत्यांची नावे चर्चेत; कुणाच्या गळ्यात पडणार माळ?
गजानन कीर्तिकर यांची पदे मिळवण्यासाठी ठाकरे गटात स्पर्धा,
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कीर्तिकर यांनी पक्ष सोडल्यानंतर आता कीर्तिकर यांच्याकडील असलेली पदे मिळवण्यासाठी ठाकरे गटात जोरदार स्पर्धा सुरू झाली आहे. ठाकरे गटात असताना कीर्तिकर यांच्याकडे शिवसेनेचं नेतेपद होतं. शिवाय स्थानिय लोकाधिकार समितीचं अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. आता ही दोन्ही पदे मिळवण्यासाठी ठाकरे गटातील एकूण सहा नेते उत्सुक असून त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आहे. ही दोन्ही पदे कुणाला द्यायची याचा निर्णय उद्धव ठाकरे घेणार असल्याने ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर ठाकरे गटानेही कीर्तिकर यांची पक्षाच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. कीर्तिकर हे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्याकडे ठाकरे गटात शिवसेनेचं नेतेपद होतं. ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही होते.

हे सुद्धा वाचा

या शिवाय कामगारांची संघटना असलेल्या स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच होतं. कीर्तिकर यांनी पक्ष सोडल्याने हे पद आपल्याला मिळावं म्हणून ठाकरे गटात चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे ही दोन्ही पदे आता ठाकरे गटात कुणाकडे जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कीर्तिकर यांनी पक्ष सोडल्याने रिक्त झालेल्या स्थानिय लोकाधिकार समिती अध्यक्षपदासाठी अनिल देसाई यांचे नाव सर्वात पुढे आहे. अनिल देसाई स्थानिय लोकाधिकार समितीचे विद्यमान सरचिटणीस आहेत. देसाई अनेक वर्षांपासून स्थानिय लोकाधिकार समितीत काम करत आहेत. ते खासदारही आहेत. शिवाय ठाकरे कुटुंबाच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे हे पद त्यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय अनिल देसाई हे पक्षाच्या नेते पदावर वर्णी लागावी यासाठीही इच्छुक आहेत. देसाई हे सध्या ठाकरे गटात सचिव म्हणून कार्यरत आहेत. सचिव पदावरून नेतेपदावर प्रमोशन व्हावं अशी त्यांची इच्छा असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे देसाई यांची दोन्ही पदांवर वर्णी लागते की एकाच पदावर वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

देसाई यांच्यापाठोपाठ स्थानिय लोकाधिकार समितीच्या अध्यक्ष पदासाठी खासदार विनायक राऊत यांचे नावही चर्चेत आहे. विनायक राऊतही खासदार आहेत. मातोश्रीच्या जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचाही या पदासाठी विचार केला जाऊ शकतो, असं सांगितलं जातं.

तर, ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेते पदासाठीच्या स्पर्धेत अनिल देसाई यांच्यासह विनायक राऊत, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, रवींद्र मिर्लेकर, विश्वनाथ नेरूरकर यांचीही नावे चर्चेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.