शिवसेना शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांच्यावर पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप होतोय. त्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी होतेय. शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी या प्रकरणी पत्र लिहून गजनान किर्तीकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. आता आनंदराव अडसूळ गजनान किर्तीकर यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई होऊ देणार नाही. “कोण आहे शिशिर शिंदे? शिशिर शिंदे यांच्यावर तीनदा कारवाई करावी. गजानन कीर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर आम्ही देखील विचार करू. अमित शहा यांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवीण दरेकर यांनी बोलू नये, महायुतीत ऐक्य नाही, असे लोक म्हणतील” असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.
“माणसाने विचार केला पाहिजे, मी कोणावरती बोलतोय. ज्याने अनेक वर्ष काम केलय, अशा माणसावर आरोप करताना आपण कोण आहोत? आपण किती छोटे आहोत? किंवा ती माणस किती मोठी आहेत एवढा तरी विचार केला पाहिजे” अशा शब्दात आनंदराव अडसूळ यांनी शिशिर शिंदे यांना सुनावलं. आशिष शेलार यांना सुद्धा आनंदराव अडसूळ यांनी प्रत्युत्तर दिलं.
आनंदराव अडसूळ काय म्हणाले?
“गजानन किर्तीकर काय म्हणाले? मी माझ्या मुलासाठी काम करू शकलो नाही, याची माझ्या मनामध्ये खंत आहे. खंत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की, त्यांनी त्यांच्या मुलासाठी काम केलेलं नाही. कुठल्याही वडिलांना असं वाटणं स्वाभाविक आहे. माझ्या घरात, माझा मुलगा असणं यात जगावेगळी गोष्ट आहे का? मी जोगेश्वरीत गेलो होतो. बैठक घेतली. बऱ्याच पदाधिकाऱ्यांना भेटलो. पुराव्यानिशी बोलावं, आरोपासाठी आरोप नको. महायुतीमध्ये आहोत, याची जाणीव ठेवा” असं आनंदराव अडसूळ म्हणाले.
आशिष शेलार किर्तीकरांवर काय बोलले?
‘गजानन किर्तीकर युती धर्माला छेद देत आहेत. याचा निषेध करतो’, गजानन किर्तीकर यांच्या भूमिकेवर शेलारांनी टीका केली आहे. “महायुतीतला उमेदवार निवडून आणणं, हे महायुतीमधल्या सर्व पक्षांच काम आहे. गजानन किर्तीकर यांचं विधान, त्यांची भूमिका महायुतीच्या युती धर्माला छेद देणारी आहे, आम्ही याचा निषेध करतो” असं आशिष शेलार म्हणाले.