मागच्या महिन्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालाने सर्वात जास्त भ्रमनिरास कोणाचा झाला असेल, तर मनसैनिकांचा आणि राज ठाकरेंच्या समर्थकांचा. कारण निवडणूक प्रचारात मनसेची हवा दिसत होती. पण निकाल बिलकुल या उलट लागले. महाविकास आघाडीचा जितका मोठा दारुण पराभव झाला, त्याहीपेक्षा मोठा पराभव मनसेचा झाला. ही सलग तिसरी विधानसभा निवडणूक आहे, ज्यात मनसेने इतकी खराब कामगिरी केलीय. 2009 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता त्यानंतर झालेल्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत मनसेला छाप पाडणारी कामगिरी करता आलेली नाही. फक्त 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते.
त्यानंतर 2014 मध्ये एक, 2019 मध्ये एक आणि 2024 मध्ये शुन्य अशी स्थिती आहे. खरंतर 2014 मध्ये मोदी लाट होती, त्यावेळी मनसेकडून अपेक्षित कामगिरी न झाल्यामुळे जनतेने मनसेकडे पाठ फिरवली. पण त्यानंतरच्या दोन्ही 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला जनतेचा विश्वास जिंकता आलेला नाही. हे निकालावरुन दिसून येतं. लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. म्हणून लोकसभेची एकही जागा लढवली नाही. विधानसभा मनसेने स्वतंत्रपणे लढवली. यावेळी किमान चार ते पाच आमदार निवडून येतील अशी अपेक्षा होती. पण एकही आमदार निवडून आला नाही. अत्यंत दारुण पराभव झाला. मतपेटीतून जनतेने त्यांच्या मनात काय आहे, ते सांगितलं.
राजीनाम्यात काय म्हटलय?
आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर खचून गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जोश भरण्याच तसच कार्यकर्ते, पदाधिकारी टिकवून ठेवण्याच मोठं आव्हान आहे. त्यात आता कोकणातून मनसेसाठी चांगली बातमी नाहीय. चिपळूण मनसेचे शहर प्रमुख अभिनव भुरण यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षातील स्थानिक राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याच त्यांनी सांगितलं. स्थानिक पातळीवरील नेते विश्वासात घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिल्याचं भुरण यांनी पत्रात म्हटलं आहे. वर्षानुवर्षे फक्त स्वतःचा फायदा करायचा आणि पक्षाला वाढवण्यासाठी स्थानिक नेतृत्व काम करत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.