पुणे : मुंबईतील प्रभादेवी (Mumabi Prabhadevi Political fight) इथं गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान शिवसेना विरुद्ध शिंदे गट (Shivsena vs Shinde) आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. विशेष म्हणजे आता नवनवे व्हिडीओ समोर येत आहेत. या व्हिडीओमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये शिंदे गट समर्थक आणि शिवसैनिक यांच्यातील अटीतटीची स्पर्धा सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. गणपती विसर्जन मिरवणुकीत पुण्यातही (Pune Politics) शिंदे गट समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आले होते. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोन्ही गटाकडून एकमेकांना चिथवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. हे व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होऊ लागले आहेत.
पुण्यातील कासेवाडी भागातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मंडळं एकमेकांसमोर आली होती. गणपतीच्या मिरवणुकीत एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं गेल्याचं या व्हिडीओत ऐकू येतंय. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा फोटो एक कार्यकर्ता हाता घेऊन नाचताना दिसलाय. या मिरवणुकीदरम्यान दोन्ही मंडळांकडून एकमेकांना चिथवण्याचा प्रकार घडला. गणेश मिरवणुकीदरम्यान घडलेला हा प्रकार आता चर्चेचा विषय ठरतोय.
प्रभादेवीत राडा, पुण्यातही शिंदे विरुद्ध ठाकरे आमनेसामने! pic.twitter.com/2HNYY4Obe8
— Siddhesh Sawant (@ssidsawant) September 11, 2022
मुंबईतही गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी शिवसेना विरुद्ध शिंदे गट आमने सामने आले होते. यावेळी एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी झालेल्या या वादाचं रुपांतर शनिवारी हाणामारीत झालं. शनिवारी शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केली, असा आरोप करण्यात आलाय. या मारहाण प्रकरणी 25 जणांना दादर पोलीस स्थानकात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. दादर पोलीस आता याप्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची, हा वाद पेटला आहे. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मुद्दा प्रलंबित आहे. दरम्यान, गणेशोत्सवात बॅनरबाजीपासूनच शिंदे गट विरुद्ध शिवसेना अशी स्पर्धा सुरु झाली होती. ती गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंतही सुरुच असल्याचं आता यानिमित्तानं पाहायला मिळतंय. मुंबईतील राजकीय राड्यानंतर पुण्यामधील मिरवणुकीच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलंय.