अहमदनगर | महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत तीव्र मतभेद असले तरीही अहमनदनगरच्या भाजपाच्या खासदाराने केलेलं वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेत आहे. राज्याती कशीही स्थिती असली तरीही नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबतच राहणार आहोत, त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) किंवा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कारवाई केली तरी चालेल, असं वक्तव्य सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी एका कार्यक्रमात केलं. या कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना उद्धव ठाकरे सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मी खासदार म्हणून निवडून येण्यात 50 टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे. याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. मातोश्रीच्या विरोधात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही मी कधी बोललो नाही. माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मला याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. शिवसेनेवर संकट येईल तेव्हा नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना मी एकटं सोडणार नाही, यावर देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली तरीही चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी एकमेव भाजप खासदार आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे सांगता येत नाही; असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे नाव न घेता सुजय विखे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. तसंच नगर जिल्ह्यातील शिवसेनेचं कौतुक केलं. ते म्हणाले, ‘ राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध रहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.