हैदराबाद | 30 नोव्हेंबर 2023 : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाआधी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस पाचही राज्यांमध्ये मुसंडी मारण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेस भारतीय राष्ट्र पक्ष अर्धात बीआरएस पक्षाला टक्कर देण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत बीआरएसच्या गेल्या दहा वर्षांपासूनच्या सत्तेला सुरुंगदेखील लागू शकतं. पण त्यासाठी काँग्रेसला एमआयएम पक्षाची साथ लागणार आहे. तेलंगणात एमआयएम पक्ष हा किंगमेकर पक्ष बनण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, एमआयएम पक्ष ज्या पक्षासोबत जाईल त्या पक्षाचं राज्यात सरकार येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे एमआयएमची बार्गेनिंग पावर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.
पॉलस्ट्रेटच्या पोलनुसार बीआरएस पक्षाला 48 ते 58 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 49 ते 59 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतर एमआयएम पक्षाला 6 ते 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपला या निवडणुकीत 5 ते जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे सीएनएक्सच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, तेलंगणात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 54 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. बीआरएस पक्षाला 52 जागांवर यश मिळणार आहे. भाजपला या निवडणुकीत 7 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर एमआयएम पक्षाला 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस आणि बीआरएस या दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएम हा किंगमेकर पक्ष ठरण्याची शक्यता आहे. एमआयएम पक्ष ठरवणार त्याच पक्षाचं राज्यात सरकार येणार आहे. त्यामुळे एमआयएमची निश्चितच ताकद वाढणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने काही महत्त्वाचे समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. एमआयएम पक्ष बीआरएससोबत सत्ता स्थापन करु शकतं. पण एमआयएम पक्षाने ठरवलं आणि काँग्रेसला पाठिंबा दिला तर मोठं राजकीय समीकरण जुळून येणार आहे. विशेष म्हणजे देशातील विरोधी पक्षांच्या सर्वात मोठ्या इंडिया आघाडीत एमआयएम पक्षाचा समावेश होणार आहे. त्यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ते जास्त घातक ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एमआयएम इंडिया आघाडीत आली तर महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी पक्षासाठी देखील इंडिया आघाडीसाठी दार खुलं होण्याची शक्यता आहे.