बारामती – आपण बारामतीच्या (Baramati)दौऱ्यावर आलो की, अधिकाऱ्यांच्या बायका म्हणत असतील आला बाबा, आणि आपल्याला शिव्या देत असतील, असं खुमासदार वक्तव्य केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी. लोकसहभागातून तयार झालेल्या अनंत फ्लॉवर गार्डनचं (flower garden)उद्घाटन संध्याकाळच्या सुमारास झाले. त्यावेळी बोलताना वेळेचा संदर्भ देत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. संध्याकळचे पावणे सहा वाजून गेले तरी कार्यक्रम सुरु असल्याने स्वाभाविकच अधिकाऱ्यांचे कुटुंबीय रागवत असतील, असा या वक्तव्याचा अर्थ होता. अर्थमंत्रालय आपल्याकडे असल्यामुळे बारामतीला झुकते माप देतो, असेही यावेळी त्यांनी बिनदिक्कतपणे सांगितले, बारामतीसाठी आपला हात ढिला होतो आणि त्यामुळे शहराचा विकास होत असल्याचंही अजित पवार म्हणाले. बारामती शहरात आम्ही झाडे लावतोय, मात्र कुणीतरी त्या झाडाचे शेंडे तोडतोय,. त्याला आपण शोधतोय असं सांगत त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले. शनिवारी सकाळपासून अजित पवारांनी बारामतीचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
आपण नास्तिक नाही, असंही यावेळी बोलताना अजित पवारांनी स्पष्ट केले. प्रत्येक धर्माचा आदर करत असल्याचे सांगत, मुस्लीम बांधवांना रमजान ईडच्या तर हिंदू बांधवांनाही त्यांच्या सणांच्या शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्या हातात माईक आला म्हणजे मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असंही त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले. बारामती तालुक्याचा चांगला कायापालट सरकारने केल्याचेही त्यांनी सांगितले. बारामतीत मोठे कॅन्सर हॉस्पिटल उभारत असल्याचेही त्यांनी सांगितले. बारामतीत सुविधा नाहीत म्हणून कुणाला मुंबई–पुण्याला जायला लागू नये, त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी जपून वापरण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी बारामतीकरांना दिला.
त्यापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पुढील २५ वर्षांचे बारामती परिसराचे नियोजन करत असल्याचे सांगितले. पुण्याच्या नंतर बारामतीची शैक्षणिक क्षेत्र म्हणून ओळख होईल, असेही त्यांनी सांगितले. यात अनेक कॅालेज आपण उभी केलीत, यामुळे बारामतीची आर्थिक व्यवहार वाढेल, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी ग्रामपंचायत मध्ये आपण लक्ष देत नव्हतो, मात्र आता नगर पालिका व नगर पंचायत ही पक्षाच्या चिन्हावर लढावयाचही आहे, असे त्यांनी सांगितले. माळेगाव नगरपंचायत निवडणूक चिन्हावर लढवणार असल्याचे सांगत त्यांनी या कार्यकमातून आगामी निवडणूक रणनीती स्पष्ट केली आहे.