मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षातच बंड केल्यानंतर आता एक एक चाली टाकायला सुरुवात केली आहे. आधी 40 आमदारांना फोडून भाजपशी हातमिळवणी करून अजित पवार सरकारमध्ये सामीलही झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. एकीकडे अजित पवार यांच्या गटाचे नेते शरद पवार यांचा उल्लेख विठ्ठल आणि आमचे गुरू असा करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी आता मोठा डाव टाकला आहे. अजित पवार गटाने थेट शरद पवार यांच्या अध्यक्षपदालाच आव्हान दिलं आहे. अजितदादाच्या गटाने निवडणूक आयोगात याचिका दाखल करून शरद पवारांना कोंडीत पकडलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करण्याच्या दोन दिवस आधीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्याची गंधवार्ता राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही नव्हती. त्यानंतर अजित पवार यांनी बंड केलं. थेट राजभवनात जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. म्हणजे ही संपूर्ण स्क्रिप्ट आधीच लिहिली होती. बंड करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. भाजप नेत्यांसोबत या संदर्भात चर्चाही झाली होती. पण राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला सुगावा लागला नव्हता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
या दोन्ही खेळी यशस्वी झाल्यानंतर अजित पवार यांनी आणखी एक मोठा डाव टाकला आहे. अजितदादांच्या गटाने शुक्रवारीच निवडणूक आयोगात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत थेट शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीलाच आव्हान दिलं आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाची निवड बेकायदेशीर असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. पक्षाची घटना आणि नियमांचं उल्लंघन करून ही निवड करण्यात आली आहे. पक्षाचा कारभारही घटना आणि नियमांचं उल्लंघन करून सुरू आहे. 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी शरद पवार यांची झालेली निवड बेकायदेशीर आहे. शरद पवारांच्या बाजूनं मतदान केलेल्या व्यक्तींची कुठलीही नोंद नाही, असं या याचिकेत म्हटलं आहे.
शरद पवाराच्या राष्ट्रवादीची रचना घटनेतील तरतुदीनुसार नाही. अध्यक्षपदासह कोणत्याही पदासाठी निवडणूक प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही. प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्षांपैकी एक होते आताही आहेत. जयंत पाटील यांचीही प्रदेशाध्यक्षपदाची निवड बेकायदेशीर होती. त्यामुळेच जयंत पाटील यांनी त्यांची हकालपट्टी केली. 30 जून 2023 रोजी अजित पवार यांची पक्षाच्या अध्यक्षपदी ठरावाद्वारे निवड करण्यात आल्याचंही या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची आज दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत आज मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. इतर राज्यातील प्रतिनिधीही आजच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचं