मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत कोल्ड वॉर?; अजित पवार म्हणतात, तुम्हाला काय त्रास…

| Updated on: Aug 12, 2023 | 10:12 AM

1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. 26 जानेवारीचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. 26 जानेवारीला पुण्यता मी ध्वजारोहण केलं. गिरीश बापटांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनीही केलं.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांत कोल्ड वॉर?; अजित पवार म्हणतात, तुम्हाला काय त्रास...
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे | 12 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रातील समितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काल दिवसभर याबाबतची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यावर अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. तुम्हाला काय त्रास आहे? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी 15 दिवसाने आढावा बैठक घ्यायचो आणि त्याला गती द्यायचो. आताही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. फडणवीस आहेत. इतर सहकारी आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्याचा आढावा ते घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांना त्या समितीची जबाबदारी दिली आहे. वास्तविक आम्ही सरकारमध्ये कशाला गेलो? महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणून गेलो. लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी गेलो. वेगवेगओळ्या प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गेलो. हे सर्व करत असताना देश पातळीवर मोदींना सपोर्ट करण्यासाठी गेलो, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्री म्हणून आढावा घेऊ शकतो

अर्थमंत्री म्हणून मी आढावा घेऊ शकतो. फायनल निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असतो. मोपलवारही बैठकीला होते. पण काहींना वेगळ्याच बातम्या चालवल्या. हे असं झालं, ते तसं झालं. तुम्हाला काय त्रास होतो? जर राज्याचे प्रश्न… मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असेल तर काय अडचण आहे. थोडीशी यंत्रणा हलवली तर कामे होतात. पॉलिटेक्निक, महावितरण आणि खासगी जागेचे प्रश्न होते. त्याचा आढावा घेतला.

सर्वांनी बसलं तर अडचणी मार्गी लागतात. त्यामुळेच मी आढावा घेतला. शेवटी कुणाचंही सरकार असलं तरी मुख्यमंत्रीच त्यावर अंतिम निर्णय घेतात. ही गोष्ट ध्यानात घ्या. लोकांची कामे व्हावेत त्यासाठी आम्ही लक्ष देत आहोत. तुम्ही काम रखडलं तर सांगा. आम्ही लक्ष देऊ ना. राज्याचा विकास व्हावा हा आमचा हेतू आहे, असं अजितदादा यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालच ध्वजारोहण करतात

येत्या 15 ऑगस्ट रोजी राज्यपाल रमेश बैस हे पुण्यात ध्वजारोहण करणार आहेत. अजितदादा आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांपैकी कुणालाही नाराज करू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्याचंही अजित पवार यांनी खंडन केलं. मी अनेक वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपल्याकडे अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. इथे कधीही 15 ऑगस्टचं झेंडा वंदन पालकमंत्री करत नाहीत.

1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. 26 जानेवारीचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. 26 जानेवारीला पुण्यता मी ध्वजारोहण केलं. गिरीश बापटांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनीही केलं. पण तुम्ही लगेच उलट्या बातम्या चालवल्या. क्षुल्लक कारणाचा बाऊ केला. तुम्ही माहिती घ्या, असं आवाहन त्यांनी केलं.

वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ती जाणून घ्या. कुणाला कुठे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी द्यावी हा राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. वेगवेळ्या मंत्र्यांना झेंडा वंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. माहिती घ्यायची नाही, रुसवे, फुगवे सांगतात. कुणाचा रुसवा आणि कुणाचा फुगवा? कुणी तुम्हाला रुसून सांगितलं. कुणी फुगून सांगितलं. चुकीच्या बातम्या देऊ नका, असं आवाहनही त्यांनी केलं.