अमरावती : जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर तसेच सरकारी दवाखान्याला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भेट दिली. तेथे आदिवासी समाजातल्या मातांची आणि त्यांच्या नवजात बालकांच्या तब्येतीची, त्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची, औषधोपचारांची माहिती घेतली. आदिवासी समाजातल्या (Tribal Community) भगिनींशी त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांकडून आदिवासी मातांना आणि त्यांच्या नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. मेळघाटातील (Melghat) कुपोषणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.
अजित पवार म्हणाले की, मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न विधानसभेत मांडणार आहे. मी प्रत्येकाला विचारत आहे की तुमच्यावर काही दबाव आहे का. अनेक मुलांचं वजन कमी आहे. मेळघाटातील कुपोषणासंदर्भात वेगवेगळ्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या. काही ठिकाणी मुलींची फार लवकर प्रसूती होती. अनेक ठिकाणी कुटुंब नियोजन पाहायला मिळत नाही. इथल्या लोकांना वेगवेगळी माहिती मिळत नाही. अनेक लोकांना रेशन कार्ड मिळत नाही. अनेक ठिकाणी धान्य खराब होतं. पण इथल्या लोकांना धान्यच मिळत नाही हा विरोधाभास आहे. राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत, पण शेवटच्या माणसाला मिळताना ते दिसून येत नाही. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. पण भारतात असाही भाग आहे, जिथं धान्य मिळत नाही, ते मिळालं पाहिजे. सरकारने याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचं अजितदादा यावेळी म्हणाले.
याप्रसंगी आदिवासी समाजातल्या भगिनींशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला; अडचणी जाणून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांकडून आदिवासी मातांना आणि त्यांच्या नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या आरोग्याशी निगडित सुविधांचा आढावा घेतला. pic.twitter.com/J4WTizwM0S
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 20, 2022
मेळघाट दौऱ्यावर असताना अजित पवार यांचा ताफा कळमखार गावात संतप्त आदिवासी महिलांनी अडवला. पावसाळ्यात नाल्याचं पाणी घरात घुसल्यानं या महिलांना आपला संताप व्यक्त केला. अजित पवार यांनीही त्या महिलांची बाजू ऐकून घेतली. आदिवासी समाजाला मुलभूत सोयी-सुविधाही मिळत नाहीत, अशा संतप्त भावना या महिलांनी अजित पवारांसमोर व्यक्त केली.
अजित पवार यांच्या मेळघाट दौऱ्यापूर्वी धारणी परतवाडा रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, रस्त्यावरील खड्डे फक्त मुरुम आणि मातीने बुजवण्यात आले.