ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सवता सुभा मांडल्यानंतर अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांना जाहीर व्यासपीठावरुन लक्ष्य केलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे कधीकाळचे कट्टर समर्थक मानले जाणारे नजीब मुल्लाही अजित पवारांना येऊन मिळाले आहेत. बऱ्याच वर्षांनंतर नजीब मुल्ला हे माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आले. त्यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा मानस बोलून दाखवलाय. ठाण्यातले राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवकही आपल्याच पाठिशी असल्याचा दावाही त्यांनी केलाय. कळवा-मुंब्रा मतदारसंघ ही कुणाचीही मक्तेदारी नसल्याचं सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरही अप्रत्यक्षपणे तोफ डागली.
2009 पासून जितेंद्र आव्हाड कळवा-मुंब्रा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाडांचे कधीकाळचे विश्वासू साथीदार होते. पण त्याच नजीब मुल्लांनी आता आव्हाडांविरोधातच दंड थोपटण्याची तयारी सुरु केलीय.
कोण आहेत नजीब मुल्ला?
नजीब मुल्ला हे राष्ट्रवादीचे राबोडी विभागाचे माजी नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेत त्यांनी गटनेते म्हणूनही काम केलंय. बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले होते. मनसे कार्यकर्ते जमील अहमद शेख यांच्या हत्या प्रकरणातही नजीब मुल्ला यांच्यावर आरोप झाले होते. ठाण्यात जितेंद्र आव्हाड हेच राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा चेहरा आहेत. आव्हाड यांना घेरण्याचा मधल्या काळात बराच प्रयत्न झाला. नजीब मुल्लाही सध्या आव्हाडांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत.
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचे 34 आणि 1 अपक्ष असं 35 नगरसेवकांचं संख्याबळ होतं. यातल्या 5 माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. अजित पवार वेगळे झाल्यानंतर आपल्यासोबत 15 माजी नगरसेवक असल्याचा दावा नजीब मुल्लांनी केला होता. पण आनंद परांजपे, नजीब मुल्ला आणि 3 माजी नगरसेवकांनीच अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती लावल्याची माहिती आहे. तर 20 माजी नगरसेवकांची साथ जितेंद्र आव्हाडांना असल्याचं बोललं जातंय.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाण्यात बॅनरबाजी केलीय. शरद पवारांच्या समर्थनासाठी लावलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. “आले किती, गेले किती, त्याची कोणाला भीती… राष्ट्रवादी फक्त शरद पवार साहेबांचीच हे बॅनर”, असं बॅनर ठाण्यात झळकलं आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड प्रचंड मताधिक्यानं निवडून आले होते. जितेंद्र आव्हाडांना 1 लाख 9 हजार 283 मतं मिळाली होती. तर शिवसेनेच्या तिकीटावर लढलेल्या दीपाली सय्यद यांना 33 हजार 644 मतं मिळाली होती. तब्बल 75 हजार 639 मतांनी आव्हाड विजयी झाले होते. पण आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत आणि राष्ट्रवादीचा दुसरा गटही आव्हाडांविरोधात उभा राहिलाय. कधीकाळी शरद पवारांसोबत सावलीसारख्या वावरणाऱ्या साथीदारांनी भाजपला साथ दिलीय. कळवा मुंब्रा मतदारसंघातही तेच होताना दिसतंय.