सस्पेन्स संपला, शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये, पवार कुटुंबियांचं एकत्र सेलिब्रेशन

| Updated on: Nov 14, 2023 | 11:09 PM

गोविंदबागेचा दिवाळी पाडवा म्हणजे पवार कुटुंबाचा आनंदाचा सोहळा... या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील पवार समर्थक बारामतीत आले, पण दिवसभर अजित पवार काही फिरकले नाहीत. मात्र रात्री अजितदादांनी सर्व सस्पेन्स दूर केला. बारामतीत दिवसभर नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सस्पेन्स संपला, शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये, पवार कुटुंबियांचं एकत्र सेलिब्रेशन
Follow us on

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 14 नोव्हेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनात सध्या काय सुरुय? आजचं राजकीय चित्र आणि हालचाली पाहता सर्वसामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय. त्याचं कारण असं की, गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल, अशी चर्चाही राष्ट्रवादीच्या गोटात रंगतेय. हे सगळं सुरु असताना बारामतीच्या गोविंद बागेत दिवाळी पाडवा उत्साहात साजरा झाला. दिवाळी पाडव्यानिमित्त गेल्या 53 वर्षांपासून शरद पवार राज्यभरातील कार्यकर्त्यांना भेटतात. कार्यकर्त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार शरद पवारांनी केला. आस्थेनं आपल्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची विचारपूसही केली.

पाडव्यानिमित्त गोविंदबागेत कार्यकर्ते, समर्थकांनी मोठी गर्दी केली असली तरी दिवसभर अजित पवारांची उणिव मात्र सर्वांनाच जाणवली. अजित पवारांनी राष्ट्रवादीत वेगळी चूल मांडल्यानंतरचा गोविंदबागेतील ही पहिलीच दिवाळी. त्यामुळे अजित पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्याबाबत विचारलं असता खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना झालेल्या डेंग्यूचं कारण पुढे केलं. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीनंतर जेव्हा खुद्द शरद पवारांना हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा पवारांनी अजितदादांना एकप्रकारे चांगलाच टोला लगावलाय.

महत्वाची बाब म्हणजे गोविंदबागेत शरद पवार राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना भेट होते. तेव्हा दिवसभर अजित पवार बारामतीतच होते. सोमवारी अजित पवारांनी काटेवाटीतील धनी कुटुंबियांनी साकारलेल्या किल्ल्यांची पाहणी केली. त्यामुळे काटेवाडीत असलेले अजित पवार दिवसभर गोविंदबागेत का आले नाहीत? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडणं स्वाभाविक आहे. कारण, गेल्या काही दिवसांतील अजित पवारांच्या भेटीगाठी आणि दौरे पाहिले, तर अजित पवार गोविंदबागेत येतील अशी अपेक्षा सर्वांनाच होती.

अखेर अजित पवार गोविंद बागेत दाखल

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी आणि गोविंदबागेतील पाडव्याला अजित पवारांची अनुपस्थिती, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असल्याचं म्हटलंय. मात्र, दिवसभर पाडव्याच्या कार्यक्रमापासून लांब राहिलेले अजित पवार रात्री 8 वाजता सहकुटुंब दाखल झाले. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारही अजितदादांसोबत स्नेहभोजनाला पाहोचले. त्यामुळे दिवसभर तयार झालेला सस्पेन्स अखेर संपला. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय गणितं आणि सुरु असलेल्या हालचाली पाहता, पुढे काय? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. पण पवार कुटुंबात राजकारणामुळं निर्माण झालेली दरी दिवाळीनिमित्त कमी होणार का? या प्रश्नाचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेल.

सुप्रिया सुळेंकडून फोटो ट्विट

सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबियांच्या गोविंद बागेतील दिवाळी सेलिब्रिशेनचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये शरद पवार आणि त्यांच्या पाठिमागे अजित पवार दिसत आहेत.

गेल्या काही दिवसातील अजितदादांचे दौरे आणि भेटीगाठी

  • 29 ऑक्टोबरला अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला.
  • 10 नोव्हेंबरला प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी पवार कुटुंबाचं स्नेहभोजन पार पडलं. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट यावेळी झाली.
  • 10 नोव्हेंबरलाच अजित पवार पुण्यातून थेट दिल्लीत दाखल झाले. अमित शाहांसोबत अजित पवारांची 40 मिनिटे चर्चाही झाली.
  • 12 नोव्हेंबरला बारामतीला दिवाळीनिमित्त आयोजित कार्यकर्मात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले.
  • 13 नोव्हेंबरला अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. सुप्रिया सुळे यांनी एक फोटोही ट्वीट केला.