फलटणमध्ये मोठा उलटफेर होताना दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. फलटणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पण रामराजे निंबाळकर हे शरद पवार गटात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर आली. पण असं असलं तरीही फलटणचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी याआधीच फलटणसाठी उमेदवारी जाहीर केल्याची माहिती आहे. असं असताना दीपक चव्हाण यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक चव्हाण यांच्यासह सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीदेखील अजित पवार गटाची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
“रामराजे, रघुनाथराजे आणि माझे राजकारण हे अपक्ष म्हणून सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय झालाय. मी शरीराने एका बाजूला होतो आणि मनाने एका बाजूला होतो हे तुम्हाला माहिती आहे. मुळात आम्ही हा निर्णय घेण्याऐवजी कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे आपण शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतोय आणि त्याला तुमच्या सगळ्यांचा होकार आहे असे मी गृहीत धरतो. यांच्यामुळे कुणाला चिन्ह माहिती नव्हते. मात्र हे कशामुळे कळले तर मागे बसलेले शरद पवार, विजयसिंह मोहिते दादा बसलेले आहेत त्यामुळे समजले”, असं संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
“आपल्याला साम, दाम, दंड भेद सगळे वापरा असे दिल्लीतील नेत्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी काहीही वापरले तरी आपण स्वाभिमानी आहोत. सातारा हा स्वाभिमानी आहे आणि दिल्लीवर राज्य करणारा सातारा जिल्हा आहे. त्यामुळे दिल्लीसमोर आम्ही झुकणारे नाहीत. भाजपचे वरिष्ठ नेते वेगळ्या प्रकारचे राजकारण करत असतील तर आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाला शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही. फलटण, माळशिरस, माण तालुक्यातील पाणी दुसरीकडे नेण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याला आळा घालण्यासाठी आपण हे करतोय”, असं संजीवराजे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील भाषण केलं. “फलटणमध्ये गेल्यानंतर तुतारी वाजणार नाही हे जमत नव्हतं. पण तुम्ही ते जमवलं त्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन. फलटणमध्ये नव्हे तर संपूर्ण गावागावात गेल्यानंतर सांगितले जाते तुतारी हाती घ्या. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. हरियाणासारखे महाराष्ट्रात घडू शकत नाही. कारण टायगर अभी यहाँ खडा हैं. मागील वर्षी 2 जुलैला घेतलेला निर्णय हा मारून मुटकुन घेतलेला होता. मात्र आता मनापासून निर्णय घेतला आहे. दिल्लीपतीसमोर गुडघे टेकणे बास, आता निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र हा झुकणार नाही आणि स्वाभिमान विकणार नाही”, असं अमोल कोल्हे म्हणाले.
“सरकार सत्तेची दिवाळी करण्यासाठी तिजोरीची होळी करायला चालले आहे. लोकसभेत मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. तुमचा पगार डबल झाला नाही पण तेलाचा भाव डबल झाला हे बहिणीला माहिती आहे. हिरे 3 टेक्के, हेलिकॉप्टरवर 5 टक्के जीएसटी आहे. पण लकेराच्या शाळेच्या वहीची किंमत दुप्पट झाली”, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.