सातारा : “आपली योग्यता काय? आपण बोलतो काय? याशिवाय आपण कुणाबद्दल बोलतोय? सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी तोंडावरच उडते“, असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केला (Ajit Pawar on Gopichand Padalkar). भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर अजित पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी पडळकरांवर सडकून टीका केली (Ajit Pawar on Gopichand Padalkar).
साताऱ्यात आज रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनिमित्तीने शरद पवार, अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी नेते साताऱ्यात उपस्थित आहेत. दरम्यान, आज दुपारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : कशाला बोलायचं, अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, शरद पवारांची पडळकरांवर पहिली प्रतिक्रिया
“लायकी नसलेल्या लोकांनी बोलणं योग्य नाही. आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आपली पात्रता पाहून बोलावं. याशिवाय त्यांना जनतेनी जागा दाखवली आहे”, अशी टीका अजित पवारांनी केली. “एखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचा हा परिणाम आहे. पडळकरांचं बारामतीत डिपॉझिट जप्त झालं होतं”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संपूर्ण देश ओळखतो. कोणतंही संकट असो ते गप्प बसत नाहीत, ते सदैव काम करत असतात. संकट काळात या वयातही ते सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात”, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : काल शरद पवार म्हणाले, लवकरच सविस्तर बोलेन, आज अजित पवार म्हणतात सध्या काही बोलणार नाही!
“पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार यांचा शब्द कधी ढळला नाही. काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी मोठ्या लोकांवर टीका करतात. मात्र, आता गुन्हा दाखल झाला आहे. कायदा आपलं काम करेल”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
पडळकर नेमकं काय म्हणाले?
“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी केला.
शरद पवार पडळकरांच्या टीकेवर काय म्हणाले?
शरद पवारांना गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली. त्यावर पवार म्हणाले, “पडळकरांना मी जास्त महत्त्व देत नाही. बारामतीत लोकसभा निवडणूक लढली, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं, विधानसभेची निवडणूक लढलं, तिथेही डिपॉझिट जप्त झालं. मग सांगलीत लोकसभा लढवली, तिथेही काही चाललं नाही. त्यामुळे काय बोलायचं” असं पवार म्हणाले.
विधानसभा, लोकसभा निवडणुकीसह इतर निवडणुकात लोकांनी डिपॉझिट जप्त केलं. ज्यांना लोकांनी बाजूला केलं, त्याची दखल कशाला घ्यायची, त्यांना काही महत्व देण्याची गरज नाही, असं पवार म्हणाले.