नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे, हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. गुढीपाडव्याची सभा, ठाण्यातील उत्तर सभा आणि रविवारी औरंगाबादेतील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या सभेतही राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. राज यांनी शरद पवारांवर जातीवादाचा गंभीर आरोप केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राजकारणात जातीवादाचं (Casteism) विष पेरलं गेल्याचा आरोप राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला. औरंगाबादेतील सभेत तर राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणातील अर्धा भाग हा शरद पवार यांच्यावरील टीकेचाच होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आता आक्रमक झाले आहेत. शरद पवार राज ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं तर महत्वाचं आहेच. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इचकंच नाही तर अजितदादांनी राज ठाकरे यांची नक्कलही केलीय! ते आज नाशिकमध्ये बोलत होते.
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार जातीपातीचं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नाशिककरांना माहिती पवार जातीयवादी आहेत की नाही. रामदास आठवले, राजू शेट्टी यांनीही सांगितलं की पवार जातीयवादी नाहीत. एखादा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व देण्याचं कारण नाही. लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती, आता तिकडची घेतली, असंही अजित पवार म्हणाले. त्यानंतर मात्र अजित पवार यांनी सुपारी घेतली म्हणजे मविआ उमेदवारांच्या सपोर्टमध्ये ते बोलत होते, अशी सावरासारव केली.
राज ठाकरे यांनी आपल्या संपूर्ण भाषणात केवळ शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरच टीका केली. यापूर्वी राज ठाकरे शरद पवारांचं कौतुक करताना थकत नव्हते. आता पवार साहेबांनी कुणाचं नाव घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही एखाद्याचं कौतुक केलं आणि नंतर टीका करायचं म्हटलं तर जीभ ही वळत नाही. ते दुपारी सभा का घेत नाहीत. संध्याकाळी वातावरण शांत असतानाच का घेतात. कधीतरी 15 दिवसातून एक सभा संध्याकाळी घ्यायची, असं अजित दादा म्हणाले. त्यानंतर त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकाकडे नॅपकिन मागितला आणि राज ठाकरे यांची नाक पुसण्याची नक्कल केली. अजितदादांनी राज यांची नक्कल करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. नॅपकिन नाकाला लावत काय ते एकदाच शिकरुन घे, असा टोलाही अजितदादांनी राज यांना लगावलाय.