बंगळूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा उडाला आहे. याचवेळी महाराष्ट्रातही मुख्यमंत्रिपदावरून रणधुमाळी सुरु आहे. मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नावाचे बॅनर पुणे, मुंबई आणि बारामतीत झळकत आहेत. तर, नागपूर या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यातही भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर झळकत आहेत. मात्र, यावरून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या देवेंद फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त करुन फडणवीस म्हणाले, लोकांनी देशामध्ये मोदीजींना स्वीकारले आहे. मोदीजींवर लोक प्रेम करतात आणि लोकांना माहिती आहे की आपले मुख्यमंत्री हे जर मोदीजींसोबत काम करणारे असले तर विकासाला वेग येतो. योजना मोठ्या चांगल्या प्रमाणात राबवल्या जातात.
जनतेने बघितले आहे की अनेक ठिकाणी जिथे दुसरे मुख्यमंत्री आले त्यांनी मोदींच्या योजना रोखल्या. इथे डबल इंजिन सरकारचे काम लोकांनी बघितले आहे. त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला लोक निवडून देणार आहेत. लोकांच्या मनामध्ये एक ठरले आहे की लोकांना मोदीजींसोबत आणि भाजप सोबत जायचे आहे. त्यामुळे इथे पुन्हा भाजपचेच सरकार निवडून येणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहेत. मुख्यमंत्री होणे ही प्रत्येकाची इच्छा असते पण कधी कधी ती पूर्ण होत नाही. अजित पवार भाजपात येणार या चर्चाना काही अर्थ नाही. आत्याबाईला मिशा असत्या तर… मावशीला दाढी असती तर… अशा गोष्टीचे उत्तर नसते. त्यामुळे ते भाजपात येणार का यालाही उत्तर नाही असेच असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून माझे बॅनर लागले आहेत. पण जून कुणी ते बॅनर लावले असतील त्यांनी ते तत्काळ कडून टाकावेत. भाजपकडून असे बॅनर लावले जाणार नाहीत. पण, कुणी उत्साही कार्यकर्ता चमकण्यासाठी, आपले नाव झाले पाहिजे, बातमी झाली पाहिजे असे करतात. पण, एक गोष्ट स्पष्ट सांगतो की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि 2024 च्या निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार निवडणूक लढेल आणि आम्ही जिंकून येऊ असे फडणवीस म्हणाले.