महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व 48 जागांवर मतदान पूर्ण झालय. पाचव्या टप्प्यात राज्यातील सर्व जागांवर मतदान संपलं. आता सर्व लक्ष 4 जूनच्या निवडणूक निकालाकडे लागल आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत. ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागू शकतात. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबईत आज महत्त्वाची बैठक सुरु आहे. यावेळी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर महत्त्वाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या होत्या.
2019 मध्ये निवडून आलेल्या जागांचा निकष त्यावेळी लावण्यात आला होता. कुठल्या पक्षाकडे निवडून आलेली कुठली जागा आहे, त्या आधारावर जागा वाटप करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला त्या आधारावर कमी जागा आल्या होत्या. म्हणून आज मुंबईत सुरु असलेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांसमोर मोठी मागणी केली आहे. लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपात खटपट होता कामा नये, असं छगन भुजबळ म्हणाले. “आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले.
‘त्यांना आत्ताच सांगून टाका’
“लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, आम्हाला एवढ्या जागा हव्या हे त्यांना सांगाव लागेल. 80-90 जागा मिळाल्या, तर 50-60 निवडून येणार. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या, असं होता कामा नये. त्यामुळे आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले. यावेळी बारामती, शिरुर, रायगड, धाराशिव या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे होते.