महायुतीत धुसफूस आहे का? आपण नाराज आहात का? अजित पवार स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Oct 11, 2024 | 8:11 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाल्याने अजित पवार रागात बैठक सोडून निघून गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतच्या चर्चांवर अजित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली.

महायुतीत धुसफूस आहे का? आपण नाराज आहात का? अजित पवार स्पष्टच म्हणाले...
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाद झाल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अजित पवार यांना आज त्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “१० वाजता कॅबिनेट मीटिंग होती. पहिला कार्यक्रम अहमदपूरला होता. मला कॅन्सल करायचा होता. मला फोन आला. म्हटलं येणार नाही. ते म्हणाले हारफुले काही देणार नाही. शेतकऱ्यांचा मेळावा आहे. मी १० वाजता तिथे कॅबिनेटला पोहोचलो. साडे बाराला उठलो. १ला टेकऑफ घेतला. आणि तो कार्यक्रम केला. त्यापेक्षा काही नाही. एखाद्याला विमान पकडायचं असेल तर माणूस जातो ना. त्यापेक्षा काही नाही. पहिले सर्वात महत्त्वाचे विषय घेतले गेले. कोणते विषय हे मला माहीत होते. त्यामुळे त्या बातमीत तथ्य नाही. हे जबाबदारीने सांगतो. नाही बाबा, धुसफूस अजिबात नाही. कुठलं चित्र नाही. ऑल इज वेल”, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी यावेळी दिलं.

“आमचे ४० ते ४२ सिटींग आहे. समोरच्या बाजूला तेवढ्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्यांना संधी आहे. आमच्याकडे १२ ते १५ रिक्त आहे. जेव्हा आम्ही बसू तेव्हा आम्हाला कळेल. त्यांनी आयाराम गयारामांबद्दल काय विधान केलं होतं. आता ते काय बोलत आहेत, कुणाला घेत आहेत हे पाहिलं असेल. शेवटी जनता जनार्दन आणि नेतेही महत्त्वाचे असते. आम्ही नेत्यांना घेण्याऐवजी सिने अभिनेत्यांपासून सुरुवात केली आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “परवा कार्याध्यक्षांचं स्टेटमेंट वाचलं. आमच्या महायुतीचे मतदारसंघ कुणाला मिळणार हे जाहीर झालं नाही. बारामती आमच्याकडे आले तर प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेली अंमलबजावणी केली पाहिजे. पण बारामती आमच्याकडे आला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

‘राजकारणात आम्ही लोकशाहीला महत्त्व देतो’

“आम्ही महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेऊन कुणाला मतदारसंघ दिले वगैरे त्याची माहिती देऊ. सिन्नरचे लोकं आग्रह करत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता प्रेमापोटी बोलत असतात. आमदारांनी मागणी केली. बारामतीत असताना कार्यकर्त्यांनी तीव्र भावना बोलून दाखवल्या. राजकारणात आम्ही लोकशाहीला महत्त्व देतो. बहुमताचा आदर करावा लागतो. अनेकदा कार्यकर्त्यांचं ऐकावं लागतं. त्यांच्याही म्हणण्याला मान सन्मान द्यावा लागतो”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

हे सुद्धा वाचा

‘कॅबिनेटने कॅबिनेटचं काम केलं’

“मी, भुजबळांनी अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम केलं आहे. शेवटी काही असलं तरी त्या विभागाला काय वाटतं ते तो विभाग करतो. ओव्हररूल करण्याचा अधिकार कॅबिनेटला आहे. विभागत तिथे बसून निर्णय घेतो. कॅबिनेट चांद्यापासून बांद्यापर्यंतचा निर्णय घेते. काही निर्णय गरीब आणि वंचितांसाठी घ्यावे लागतात. आज नाही. निवडणुका आल्या म्हणून तुम्ही म्हणता. त्यांनी त्यांचं काम केलं. कॅबिनेटने कॅबिनेटचं काम केलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.

‘रामराजे निंबाळकर यांनी अजून कोणताही निर्णय घेतला नाही’

“या आर्थिक वर्षात दोन महिने लोकसभेच्या आचारसंहिता. दोन महिने विधानसभेच्या. आचारसंहिता ३५ दिवसाची असली तरी काही वेळ जातो. या सर्वांचा विचार करून अर्थ संकल्प सादर केला. उद्याच्या काळात या निवडणुका झाल्यावरही व्यवस्थितपणे राज्याचा आर्थिक गाडा पुढे नेण्यात आम्ही यशस्वी होऊ. रामराजे नाईक निंबाळकरांशी मी, पटेल, तटकरे बोललो. आम्ही सर्व चर्चा करत आहोत. बातम्या येत असतात. अनेकांबद्दल येतात. त्यांनाही माहीत नसतं बातम्या कशा आल्या. पण निंबाळकर यांनी अजून कोणताही निर्णय घेतला नाही”, असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.